उत्तर महाराष्ट्र

नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी

गणेश सोनवणे

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मनमाडमधील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) धान्य साठवणूक गोदामाला भेट देत तेथील धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धान्यसाठ्याची माहिती घेतली.
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानावर वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याने तसेच त्यात काही त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. धान्याचे वितरण सुलभ आणि वेळेत करण्यासाठी अन्न महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवत वितरणास गती द्यावी, अशा सूचना त्यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांनी गोदामातील धान्याचा दर्जादेखील तपासला.

मनमाड शहरात ब्रिटिशकालीन भारतीय अन्न महामंडळाचे धान्य गोदाम आहे. तब्बल 265 एकरांवर असलेल्या या गोदामात 32 सायलो आणि 125 पेक्षा जास्त गोदामे आहेत. त्यात हजारो मेट्रिक टन धान्य साठवले जाते. पंजाब, हरियाणा यासह इतर राज्यातून रेल्वेद्वारे गहू आणि तांदूळ आणले जातात. त्यानंतर हे धान्य राज्यातील रेशन दुकानांना पुरविले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी गरजू नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत एक वर्ष मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा केली. जिल्हा प्रशासनाकडून दरमहा 1500 मेट्रिक टन धान्याची मागणी केली जात असताना फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन पुरवठा का केला जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, अधिकाऱ्यांना याबाबत व्यवस्थित उत्तर देता आले नाही. यावेळी एफसीआयच्या विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांच्यासह अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT