नगर : झेडपीचे शिष्यवृत्तीत पाऊल पडती पुढे...! 12 फेब्रुवारीला परीक्षा; 11 चाचण्यांमधून पूर्वतयारी | पुढारी

नगर : झेडपीचे शिष्यवृत्तीत पाऊल पडती पुढे...! 12 फेब्रुवारीला परीक्षा; 11 चाचण्यांमधून पूर्वतयारी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दिवसेंदिवस इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही मराठी शाळांची गुणवत्ता काहीशी वाढतानाच दिसत आहे. आता 12 फेब्रुवारीला होणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हाभरातून पाचवी व आठवीचे सुमारे 60 हजार विद्यार्थी बसणार आहेत, या मुलांच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या सहा सराव चाचण्यांमध्ये पाचवी 43, तर आठवीचा 30 टक्के निकाल लागून प्रगती दिसत आहे. आणखी पाच चाचण्या घेतल्या जाणार असून, यात हा टक्का आणखी वाढणार आहे.  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केली जाते.

गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचा 27.19, तर आठवीचा 13.25 टक्के निकाल लागला होता. हा टक्का वाढता असला तरी फारसा समाधानकारक नसल्याने शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी यावर्षी नगरला टॉप आणण्यासाठी सुरुवातीपासून तयारी हाती घेतली. यावर्षी 12 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.  या परीक्षेसाठी पाचवीचे 33 हजार 574, तर आठवीचे 22 हजार 476 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात पाटील यांनी मुलांच्या 11 सराव चाचण्यांचा कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक आठवड्याला एक चाचणी घेतली.  आतापर्यंत सहा चाचण्या घेतल्या यात, पाचवीचा पहिल्या चाचणीत 30.69, तर सहाव्या चाचणी अखेर 42.62 टक्के निकाल लागून प्रगती दिसली, तर आठवीचा पहिली चाचणीत 19.90, तर सहाव्या चाचणी अखेर हा निकाल 28.18 टक्के असा वाढताना दिसला. आणखी पाच चाचण्या बाकी असून 12 फेब्रुवारी पर्यंत ही प्रगती आणखी वाढताना दिसणार आहे.

कारणे दाखवा नोटीस अन् अभिनंदन पत्रही !

सराव चाचण्या घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी शाळांचे निकाल ऑनलाइन वेबसाईटवर टाकण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या आहेत. त्यामुळे कोणत्या शाळांची काय प्रगती हे समजते. पहिल्या चाचणीत पाचवीच्या 31 तर आठवीच्या 11 शाळांचा निकाल 0 टक्के लागला होता, या शाळांना गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या, त्याचा परिणाम म्हणून सहाव्या चाचणीत पाचवीच्या 9 , तर आठवीत 8 शाळाचा शून्य टक्के निकाल लागला आहे. ही आकडेवारी कमी होताना दिसत आहे. तसेच सहाव्या चाचणीत पाचवीच्या 39, आठवीच्या चार शाळांचा निकाल 100 टक्के लागला, त्या शाळांना अभिनंदनाचे पत्र पाठविले आहेत.

सीईओंची ती मार्गदर्शिका संकल्पनेतच…!

तिसरी आणि चौथीच्या मुलांकडून पाचवी व आठवीला होणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेची अगोदरपासूनच तयारी करून घेण्यासाठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका तयार करण्यात आली, यात तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. मराठी व गणित आणि बुद्धिमत्ता व इंग्रजी असे दोन संच तयार झाले, हे संच मुलांना शाळेत अभ्यासासाठी दिले जाणार होते, मात्र त्याच्या छपाईच्या खर्चाचा ताळमेळ न बसल्याने या वर्षी तरी हे पुस्तक केवळ संकल्पनेतच दिसणार आहे, कदाचित हा संच लवकर मुलांच्या हातात पडला तर त्याचा निकाल वाढीसाठी मदत होणार आहे.

Back to top button