उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत

अंजली राऊत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव बसस्थानकातच हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घरी सुखरूप पोहोचविण्यात लासलगाव पोलिसांना यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव बसस्थानकात तीनवर्षीय बेपत्ता मुलगा सापडल्याबाबत बस आगाराचे नियंत्रक उखाडे यांनी शहरात पेट्रोलिंगसाठी गस्त घालत असलेल्या पोलिस हवालदार कैलास महाजन, पोलिस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांना माहिती दिली. त्यानुसार लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने बेपत्ता मुलाची माहिती हस्तगत करत त्याच्या कुटुंबीयांना शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. सोशल मीडियावर मुलगा हरविल्याबाबत माहिती प्रसारित केली. त्यानंतर त्वरित हरवलेला मुलगा पिंपळद येथील सार्थक घोगरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या बालकाला राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कैलास महाजन, पोलिस नाईक देवीदास पानसरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, माया वाघ यांनी मुलाचे आजोबा शिवनाथ बाबूराव घोगरे (रा. पिंपळद, ता.चांदवड) यांचे ताब्यात दिले. लासलगाव पोलिस स्टेशनच्या प्रसंगावधान व सजगतेमुळे अवघ्या काही तासांमध्येच सार्थकला त्याच्या पालकांचा शोध घेता आला. त्यामुळे पिंपळद येथील रहिवाशांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे आभार मानले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT