उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऐन सणासुदीच्या काळात बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबईनाका पोलिसांनी उधाळून लावला. भारतीय चलनाच्या पाच लाखांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित इडली विक्रेत्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मलायारसन मदसमय (रा. ३३, व्यव. इडली व्यवसाय, रा. ३९, ईस्ट स्ट्रीट, कायथर, पनिक्कारकुलम्, तुतूक्कुडी, तमिळनाडू) असे संशयिताचे नाव आहे.

मुंबईनाका परिसरातील हॉटेल छानच्या मागील परिसरात बनावट पद्धतीने छापलेल्या नाेटांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भारतनगर परिसरात सापळा रचून संशयित मलायारसन मदसमय याला ताब्यात घेतले. संशयिताची सहायक निरीक्षक के. टी. रौंदळे यांनी राजपत्रित आधिकाऱ्यांसमोर अंगझडती घेण्याचा प्रयत्न करताच त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवत उपनिरीक्षक बाळू गिते यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या २४४ व पाचशे रुपयांच्या ४० बनावट नोटा आढळून आल्या. तसेच ३,३०० रुपयांची रोकड मिळाली.

जप्त केलेल्या नोटा प्रथमदर्शनी खऱ्या असल्याचे दिसून आले. मात्र, बारकाईने निरीक्षण केले असता, त्यात महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क नाही व सिक्युरिटी थ्रेड नसून त्याजागी हिरव्या रंगाचे रेडीयमचे तुकडे चिटकविल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे काही नाेटा या एकसारख्या नंबरच्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, मुंबईनाका पोलिसांत बनावट नाेटा बाळगणे, बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट नोटा प्रकरणी संशयिताची सखोला चौकशी केली जात असून, यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का याचा तपास सुरू आहे. जप्त केलेल्या नाेटा या कलर प्रिंटमार्फत बनवून त्याच्यावर थ्रेज न देताच कागद चिकटविण्यात आल्या आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तामिळनाडू व मदुराई येथे पथके रवाना केले जातील.

– सुनिल राेहाेकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पाेलीस स्टेशन

मदुराईपर्यंत कनेक्शन

संशयिताची काैटुंबिक स्थिती सामान्य असून बहीण व भाऊ नाेकरी करतात. त्याचा मित्र मदुराईत राहणारा असून त्याच्याकडून त्याने या नाेटा आणल्याचे समाेर येत आहे. त्याचे शिक्षण अवघे सहावीपर्यंत झालेले आहे. ताे पूर्वाश्रमीचा इडली विक्रेता असून त्याचा चार ते पाच वर्षांपूर्वी पंचवटी महाविद्यालयाजवळ इडली विक्रीचा व्यवसाय हाेता. दरम्यान, नुकत्याच पार कालिका यात्रेतही त्याने बनावट नोटा दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT