उत्तर महाराष्ट्र

नाशिक : समान नागरी कायदा नसलेला देश सेक्युलर कसा? : स्वामी गोविंददेव

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. सर्वांसाठी एक कायदा असणे यालाच सेक्युलर म्हणता येईल, अन्यथा त्या देशाला सेक्युलर कसे म्हणता येईल, असा प्रश्न रामजन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला.

स्वामी गोविंददेव मंगळवार (दि.17)पासून दोन दिवस नाशिक दौर्‍यावर आले आहेत. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्ञानवापीमध्ये सुरू असलेले सर्वेक्षण व तपास काही नवीन नाही. या प्रकारचे ऐतिहासिक पुरावे अनेक शतके आधीच मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पुरातन काळातील नंदीचे तोंड मशिदीकडे असल्याने त्यासमोर शिवलिंग मिळणे आणि इतरही काही मूर्ती मिळणे स्वाभाविकच आहे. तीन मंदिरे आम्हाला देऊन टाका. चौथ्या कुठल्याही मंदिराचा वाद होणार नाही, ही भूमिका अशोक सिंघल यांनी त्यावेळी मांडली होती आणि ती योग्य होती. मुस्लीम पक्षकार त्यांचे दावे करतीलच. पण, वस्तुस्थिती काय आहे हे बघितले पाहिजे. मी विद्यार्थिदशेत तेजोमहालय पुस्तक वाचले होते.

आम्हा सर्वांना विश्वास आहे की, ताजमहालच्या ठिकाणी राजपुतांनी शिवमंदिर बांधलेले होते आणि त्याचे नाव तेजोमहालय होते. केवळ शहाजहाँनने बांधलेली इमारत नव्हती, तर त्या ठिकाणी हिंदूंची काहीतरी मूळ वास्तू होती, असा विश्वासही स्वामी गोविंददेव गिरी यांनी व्यक्त करत या ठिकाणच्या बंद खोल्या उघड्या करून त्याचे रेकॉर्डिंग करून घ्यावे म्हणजे प्रश्न मिटतील, अशी सूचनाही त्यांनी केली. सर्वांच्या सहमतानेच सर्व व्हावे, असे वाटते आणि त्यासाठी मुस्लीम समाज स्वतःहून पुढे येऊन सलोख्याच्या वातावरणात प्रश्न मिटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अयोध्येचा राम सर्वांचाच
अयोध्येतील राम सर्वांचाच आहे. ज्याला वाटेल त्याने येऊन दर्शन घ्यावे. त्यावर कुणाचाही प्रतिबंध असू नये, असे त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मत मांडले. कालपर्यंत श्रीरामाचा विरोध करणारा रावण जरी असला आणि त्याने अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त केली तरी कोणी रोखू नये, असे आवाहन करत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्‍याला एक प्रकारे पाठिंबाच व्यक्त केला. मात्र, अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा असावी, याची जाणीवही करून दिली.

फेब—ुवारी 2024 मध्ये रामलल्लाची स्थापना
फेब—ुवारी 2024 मध्ये गर्भगृहात रामलल्लाची स्थापना करण्यात येणार असून, तोपर्यंत पहिला मजला आणि गर्भगृह होईल. यामुळे लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिराचे बांधकामही सुरू राहील, असे गोविंददेव गिरी यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT