सातारा : औंध संग्रहालयात 7 हजार दुर्मीळ कलाकृतींचा ठेवा | पुढारी

सातारा : औंध संग्रहालयात 7 हजार दुर्मीळ कलाकृतींचा ठेवा

औंध (सातारा) : सचिन सुकटे
राज्यातील पुरातत्व विभागाच्या 13 संग्रहालयांपैकी औंधचे श्रीभवानी वस्तुचित्रसंग्रहालय हे वैविध्यपूर्ण संग्रहालय म्हणून ओळखले जाते. सुमारे 7 हजार कलाकृतींचा खजिना असलेले हे एकमेव संग्रहालय आहे. दुर्मिळ कलाकृती, पेंटींग्ज, वस्तू, इतिहास कालीन हत्यारे या संग्रहालयामध्ये असून इतिहास प्रेमींसाठी हे संग्रहालय अनोखा ठेवा ठरले आहे. या संग्रहालयाची देशभरातील इतिहासप्रेमींना भुरळ पडली आहे.

औंध संस्थानचे अधिपती कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी दुरदृष्टीतून या संग्रहालयाची मूळपीठ डोंगराच्या मध्यवर्ती भागावर असलेल्या ठिकाणी 1938 साली निर्मिती केली. पूर्वी छोटेखानी असलेल्या या संग्रहालयाचा मागील 80 वर्षात मोठा विस्तार करण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार व औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी संग्रहालयाची जुनी इमारत कलाकृती मांडणीसाठी कमी पडत असल्याचे ध्यानात घेऊन मागील दहा वर्षापूर्वी संग्रहालयाच्या विस्तारित इमारतीचे काम केले. त्यासाठी सुमारे दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. संग्रहालयातील दुर्मिळ पेंटींग्जमध्ये राजा रविवर्मा यांची तीन महत्वाची पेंटींग्ज आहेत. यामध्ये सैरंद्री, मल्याळ स्त्री, दमयंती यांची देखणी पेंटिंग्ज पाहण्यासारखी आहेत. त्याचबरोबर ठाकूरसिंग यांचे ओलितीचे पेंटींग्ज जागतिक दर्जाचे आहे. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रामायणातील प्रसंग रेखाटले आहेत.त्याचबरोबर शिवकालीन वस्तू, हत्यारे, धातूच्या, विविध प्राण्यांच्या शिंगाच्या वस्तू आहेत.

कर्नाटकातील सुप्रसिद्ध कारागीर रामचंद्र सुबराव गुड्डीगार यांनी चंदनाच्या लाकडावर कोरलेले रामायण व शिवचरित्राचे प्रसंग सर्वांनाच मोहित करतात.तसेच पाथरवट यांनी हस्तीदंतावरती कोरलेली कला तर अचंबित करण्यासारखी आहे. त्यामुळे इतिहास संशोधक, अभ्यासक तसेच आजच्या नवीन पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन देणार्‍या अनेक दुर्मिळ कलाकृती, पेंटींग्ज, वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. संग्रहालयामध्ये भरतकाम केलेल्या अनेक कलाकृती पाहावयास मिळतात. त्याचबरोबर बाळासाहेब पंतप्रतिनिधी परदेशात गेले होते. त्यावेळेस अनेक दुर्मिळ वस्तू त्यांनी संग्रहीत केल्या होत्या. त्यामध्ये विविध दुर्मिळ कॅमेरे, जपानी वस्तू, पेंटींग्ज तसेच अन्य वस्तू आणल्या होत्या त्याही याठिकाणी मांडल्या आहेत. औंध संग्रहालयामध्ये गॅलरी, कोर्टयार्ड तसेच 18 दालनात सुमारे 7 हजार वस्तू, दुर्मिळ कलाकृती मांडल्या आहेत. पर्यटकांसाठी ही अपूर्व पर्वणी आहे.

महाराष्ट्र नव्हेच देशातील एवढया मोठ्या दुर्मिळ कलाकृतींचा खजिना असलेले औंध येथील श्रीभवानी चित्रसंग्रहालय हे एकमेव संग्रहालय आहे. त्याचबरोबर संग्रहालय परिसरात सुंदर बगीचा पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर आल्हाददायक व सुंदर बनला आहे. संग्रहालय बाह्य परिसरात ही ऐतिहासिक 462 पार्‍या आहेत. त्याठिकाणी विविध प्रकारचे संगमरवरी पुतळे बसवण्यात आले आहेत. संग्रहालय सुरक्षेसाठी सुमारे 230 कॅमेरे, पोलिस, सिक्युरिटी गार्ड तैनात करण्यात आले आहे. तसेच जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त पर्यटक, संशोधक, अभ्यासकांच्या स्वागतासाठी संग्रहालय परिसर व कर्मचारी सज्ज झाले आहेत. तरी संग्रहालयातील कलाकृती पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन संग्रहालय सहाय्यक श्रेयश जगताप यांनी केले आहे.

पर्यटकांसाठी आज संग्रहालय मोफत खुले…

सातारा जिल्ह्यासह राज्याचे भूषण असलेल्या जागतिक दर्जाच्या औंध येथील श्रीभवानी वस्तू चित्रसंग्रहालयामध्ये बुधवार दि. 18 रोजी जागतिक वस्तूसंग्रहालय दिनाचे औचित्य साधून संग्रहालय पर्यटकांसाठी मोफत खुले ठेवण्यात आले आहे. यावेळी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने संग्रहालयास भेट देणार्‍या पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त सर्व पर्यटकांसाठी हे संग्रहालय मोफत खुले ठेवण्यात आले आहे. संग्राहलय पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना कलाकृतींची माहिती देण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात पर्यटकांना जास्तीत जास्त निसर्गाचे सान्निध्य लाभावे म्हणून संग्रहालयाच्या पाठिमागील बाजूस ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली जाणार आहे.
– उदय सुर्वे, औंध

Back to top button