उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हेल्मेटसक्ती न ठरो ‘नवलाई’!

गणेश सोनवणे

नाशिक : गौरव अहिरे 

पाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलिसांनी पुन्हा हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, नवलाई संपताच पोलिसांनाच कारवाईचा विसर पडेल, असेच चित्र नेहमीप्रमाणे या कारवाईच्या वेळीही राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या हितासाठी हेल्मेटसक्ती असल्याचा दावा केला जात असला, तरी त्यात पोलिसांचे गांभीर्य दिसत नाही. पोलिसच स्वत: हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करावी, हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडतो आहे. त्यातही कारवाईत नावीन्य राहण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा केल्या जात असल्याने, दरवेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये वादाचे, नाराजीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे कायदा आणि अंमलबजावणी यात सर्वसामान्य भरडला जाऊ नये, ही अपेक्षा.

शहरात अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक दुचाकीस्वारांचा समावेश असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार 54 पुरुष व आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यात विनाहेल्मेट 56 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. दरवर्षी अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू सर्वाधिक होत असतो. त्यामुळे खबरदारी म्हणून हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनही प्रयत्नशील आहे. मात्र, हेल्मेटसक्ती करताना वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जाताना, नागरिक व इतर यंत्रणांना गृहीत धरण्याची कल्पना चुकीची असल्याचे बोलले जात आहे. या आधी कोणत्याही शासकीय- निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्थामध्ये येणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. विनाहेल्मेट प्रवेश देणार्‍या संस्थाचालक किंवा प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्यात येत होते.

मात्र, या आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे झाली, हे पोलिस यंत्रणेलाही चांगलेच ठाऊक आहे. पोलिसांनी शैक्षणिक संस्थाचालकांविरोधात कारवाईचे सोपस्कार पार पाडत, आम्ही आदेशाची अंमलबजावणी चोख करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वत:कडे दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये वचक राहावा, यासाठी विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकांचे दोन तास समुपदेशन व परीक्षा घेण्यासोबतच दंड आकारला जात आहे. या मोहिमेचे काहींनी स्वागत केले, तर अनेकांनी विरोध केला. कारण हेल्मेटसक्ती फक्त नागरिकांसाठीच आहे का, पोलिसांसाठी नाही का, असा प्रश्न येथेही निर्माण झाला.

कारण दुचाकीस्वार पोलिसही हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करीत असतात. त्यानंतर आता विनाहेल्मेट दुचाकीचालकाला पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंपचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिल्याने पंपचालक-मालक विरोधात गेले आहेत. याआधीही पेट्रोल पंप चालक-मालकांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे. त्यावर न्यायालयाने पुन्हा पोलिस आयुक्तांकडे जाण्यास सांगितले होते. मात्र, त्या प्रश्नाकडे पोलिस आयुक्तांनी चार महिने दुर्लक्ष केल्याचा आरोप पंपचालकांनी केला आहे. त्यामुळे जुने प्रश्न 'जैसे थे'च असताना नवे प्रश्न, समस्या निर्माण होत असल्याने पोलिसांविरोधातील रोष वाढत असल्याचे दिसत आहे. हेल्मेटसक्ती वर्षानुवर्षे केली जात आहे.

त्यात अनेकदा काही प्रमाणात यश येते व कालांतराने विसर पडतो. कारवाईचा धाक असल्याने काही नागरिक हेल्मेट जवळ बाळगतात मात्र वापर फक्त पोलिसांसमोरच करतात. पोलिसांच्या दृष्टिआड होताच हेल्मेट दुचाकीला लटकलेले असते. त्यामुळे हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी इतर यंत्रणांचा वापर करण्याऐवजी वाहतूक पोलिसांची क्षमता वाढविण्यासोबतच शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करून त्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केल्यास हेल्मेटचा वापर वाढेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा एक हुजऱ्या शाहू महाराजांना सर्वांसमक्ष रागावतो | छत्रपती शाहू महाराज |

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT