नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दि. २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महापालिकेने दोन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महापालिकेने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असताना खड्डे पडल्याने यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय माजी महापौर पाटील यांनी व्यक्त केला आहे. ठेकेदारांकडून केवळ बिले काढण्याचे काम केले जाते. रिंग करून ठेके मिळवले जातात. या सर्व प्रकारात ठेकेदारांबरोबर मनपाचे अधिकारीही सहभागी असतात. याबाबत विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.