सासवड : पुढारी वृत्तसेवा : बोपगाव (ता. पुरंदर) परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेती, घरे, रस्ते व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्यांना पूर आल्याने लगतच्या शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरंदर तालुक्यातील बोपगाव, भिवरी, चांबळी, हिवरे व गराडे या भागात जोरदार पावसाने ओढ्यांना पूर आला. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील पूल खचले. रस्त्याच्या साईड पट्ट्या वाहून गेल्या. तसेच सासवड ते कोंढवा रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहामुळे कित्येक तास वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी शेतातील ताली पडल्या. उभी पिके जमीनदोस्त झाली.
बोपगाव येथे झालेल्या जोरदार पावसाने अंदाजे 25 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये वाटाणा, टोमॅटो, सोयाबीन, भुईमूग व फूलशेतीत पाणी साचले. तसेच पुलाचे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शासनाने पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बोपगाव येथील शेतकरी प्रकाश काशिनाथ फडतरे यांनी केली आहे. पुरंदर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने महसूल, कृषी व ग्रामविकास या तीनही यंत्रणांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पंचनामा करून अहवाल शासनास सादर करण्यात येईल, असे पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सांगितले.