उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कर्कश आवाजाच्या दुचाकींवर पोलिसांचा ‘अंकुश’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करीत वाहने चालविणाऱ्या चालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. गंगापूर पोलिसांनी शनिवारी (दि. ८) दिवसभर कारवाई करीत सात दुचाकी जप्त केल्या असून, या वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केली जाणार आहे. वाहनांच्या मूळ रचनेत बदल केला असल्यास संबंधित वाहनमालकाला १० हजारांहून अधिकचा दंड आकारण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार वाहने भरधाव चालविणाऱ्यांसह कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी आतापर्यंत ४९ चालकांवर कारवाई करीत त्यांना २ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जप्त केलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक बुलेट असून त्याचप्रमाणे हायबुझा व इतर स्पोर्टस् बाइकही आहेत. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले, बाजारपेठ, उद्याने असल्याने येथे तरुण वर्गाची सर्वाधिक वर्दळ असते. त्यात काही दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकी भरधाव चालवत कर्णकर्कश आवाज करतात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत असतो. क्षणात ही वाहने दिसेनाशी होत असल्याने त्यांची तक्रारही नागरिकांना करता येत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे गंगापूर पोलिसांनी गस्ती पथकाच्या माध्यमातून अशा दुचाकीस्वारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत गंगापूर पोलिसांनी ४९ वाहने जप्त केली असून, त्यांची चौकशी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केली. त्यात अनेकांनी वाहनांच्या सायलेन्सरसह इतर बदल केल्याचे आढळल्याने त्यांना दंड आकारण्यात आला आहे. याआधीही गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी बायकर्स ग्रुपसोबत संवाद साधत वाहने सावकाश व कोणालाही त्रास होणार नाही, अशा रीतीने चालविण्याची सूचना केली होती. तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जनजागृतीचे आवाहन केले होते. मात्र काही टवाळखोर युवक आजही वाहने जोरात चालवून इतरांना त्रास देत असल्याचे आढळून येत असल्याने पोलिसांनी कारवाईची धार वाढविली आहे. रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. वाहनांच्या मूळ रचनेत बदल केलेला आढळून आल्यास संबंधित वाहन जप्त करून मालकावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूरसह इतर महाविद्यालयीन परिसराजवळ कर्णकर्कश हॉर्न व सायलेन्सरचा त्रास नेहमीचाच आहे. महाविद्यालयीन युवक व टवाळखोर त्यांच्या दुचाकींना प्रेशर किंवा चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न बसवितात. तसेच दुचाकीला पंजाब, इंदूर ढोलकी, शार्क, डॉल्फिन अशा विविध प्रकारचे सायलेन्सर बसवितात. गर्दीच्या ठिकाणी किंवा तरुणींचा घोळका दिसताच टवाळखोर, बेशिस्त वाहनचालक प्रेशर हॉर्न वाजवितात तसेच सायलेन्सरमधून फटाके फोडल्यासारखा आवाज काढतात. त्यामुळे बेसावध नागरिक गोंधळतात किंवा घाबरतात. अनेकदा लहान मुलेही दचकून रडत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा होत असते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT