पुण्यात फळभाज्यांचे दर घसरले; मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याचा परिणाम

पुण्यात फळभाज्यांचे दर घसरले; मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याचा परिणाम

पुणे : पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दोडका, कारली, काकडी, ढोबळी मिरची, शेवगा व तोतापुरीच्या कैरीच्या आवकेत मोठी वाढ झाली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने त्याच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घसरण झाली.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. 9) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 110 ते 115 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत त्यामध्ये 10 ते 15 ट्रकने वाढ झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने आले, हिरवी मिरची, मटार व पावट्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

परराज्यातील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 1 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, कर्नाटकातून 3 तर आंध्र
प्रदेशातून 1 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे 10 ते 12 टेम्पो, ट्रक आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1 हजार 100 ते 1 हजार 200 गोणी, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेट, कोबी 5 ते 6 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 6 ते 7 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 आणि फ्लॉवर प्रत्येकी 10 ते 12 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, मटार 200 ते 225 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 80 ते 90 ट्रक, इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा 40 ट्रक आवक झाली होती.

मेथी, शेपू, करडई, पालकच्या भावात वाढ

उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटण्यास सुरुवात झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने मेथी, शेपू, करडई आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे. केवळ चाकवत आणि कांदापातेच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. येथील बाजारात रविवारी (दि. 9) कोथिंबिरीची दीड लाख जुड्यांची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडशा आवक झाली. घाऊक बाजारात मेथी, शेपू, करडई आणि पालकच्या भावात जुडीमागे प्रत्येकी एक रुपयाने वाढ झाली आहे. चाकवत आणि कांदापातीच्या भावात प्रत्येकी एक रुपयाने घट झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news