Trimbakeshwar,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

Nashik : हरिहर रथोत्सवाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षांच्या कोरोना लॉकडाऊननंतर यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवाने त्र्यंबकनगरी दुमदुमली. भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीतून मिरवण्यात आला. तो यावर्षी रथातून मिरवण्यात आला.

रथाला यावर्षी तीन बैलजोड्या जोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गाजरे यांच्या दोन आणि अडसरे यांची एक जोडी सजवण्यात आली होती. मात्र, वेळेवर शिखरे यांची एक जोडी जोडण्यात आली. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने तीन जोड्या निश्चित केलेल्या होत्या. त्यामुळे पेगलवाडी येथून शिवाजी लहांगे यांची बैलजोडी सजवून आणली होती, परंतु ती बाहेर घेण्यात आली. त्यामुळे पेगलवाडीचे शेतकरी लहांगे हे हिरमुसले होऊन बाजूला जाऊन उभे राहिले होते. परंतु स्थानिकांनी त्यांची समजूत काढत त्यांना मिरवणुकीत सहभागी करून घेतले.

विंचुरकर यांचे पुरोहित अग्निहोत्री यांनी आरती केली. दरम्यान, रथोत्सवासाठी यावर्षी प्रथमच खा. हेमंत गोडसे, बाळासाहेबांची शिवसेना नेते संजय माशलीकर, शहरप्रमुख सुरेश गांगपुत्र उपस्थित राहिले. विश्वस्त तृप्ती धारणे, भूषण अडसरे, अ‍ॅड. पंकज भुतडा, दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, मुख्याधिकारी संजय जाधव आदी उपस्थित होते. रथाच्या पुढे चांदीचा मुखवटा असलेली पालखी होती. सोमवारची पालखी आणि रथोत्सवाची पालखी एकाच वेळस काढण्यात आली. पालखीसोबत अनिल तुंगार, राज तुंगार, योगेश तुंगार, मनोज तुंगार हे पुजारी उपस्थित होते.

रथ कुशावर्त चौकात आल्यानंतर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी स्वागत केले. दरम्यान पूर्वीप्रमाणे कुशावर्त चौक, मेनरोड आणि लक्ष्मीनारायण चौक येथे रथाची आरती करण्यात आली. सकाळी मंदिर संस्थान इमारतीमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम झाला. नगरसेविका मंगला आराधी यांना पानसुपारी देऊन निमंत्रण देताना विश्वस्त संतोष कदम, प्रशांत गायधनी उपस्थित होते.

तीनशे फुटांची रांगोळी
मेनरोडवर महामृत्युंजय प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळाचे कुणाल उगले आणि भाजपच्या नगरसेविका शीतल उगले यांच्या वतीने 300 फूट रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्यावर ऑइलपेंटने रांगोळी रंगवण्यात आली होती. त्यावर फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रचितीराज मित्रमंडळ, लक्ष्मीनारायण चौक मंडळ यांनी रांगोळी काढत रंगत वाढवली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT