नगर : शेतकरी कंगाल; विमा कंपनी मालामाल..! | पुढारी

नगर : शेतकरी कंगाल; विमा कंपनी मालामाल..!

गोरक्षनाथ शेजूळ

नगर : शेतकर्‍यांनी पोटाला चिमटा काढून आपल्या पिकांचा विमा काढला, मात्र परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीनसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही अद्याप भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आता आक्रमक होऊन विमा कंपन्यांचे कार्यालय शोधू लागला आहे. जिल्ह्यात 2 लाख 23 हजार 435 शेतकर्‍यांनी खरीप विमा काढला होता.

त्यासाठी 14 कोटी 36 लाखांची पदरमोड केली, तर राज्य आणि केंद्राचे 66 कोटी अशा एकूण 81 कोटींची रक्कम पिकविमा कंपनीला दिली, मात्र, या मोबदल्यात कालअखेर केवळ 20 हजार शेतकर्‍यांना 9 कोटींची मदत मिळाली आहे, तर उर्वरित शेतकरी अजुनही पिकविमा कंपनीकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान आधारीत पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान पिकविमा योजना हाती घेण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकरी हिस्सा आणि पिकानुसार समप्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारही शेतकरी हिस्सा संबंधित विमा कंपनीला भरत असते.

जिल्ह्यात 1 लाख 22 हजार हेक्टरला संरक्षण
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिकविमा काढण्यासाठी एचडीएफसी इंन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती केलेली आहे. या कंपनीकडे जिल्ह्यातील 2 लाख 23 हजार 435 शेतकर्‍यांनी आपल्या 1 लाख 22 हजार 975 हेक्टरवरील खरीप पिकांना विमा संरक्षण घेतले होते. त्यापोटी शेतकर्‍यांनी 14 कोटी 36 लाख 69 हजार 343 रुपयांचा भरणा केला होता.

सव्वादोन लाख शेतकर्‍यांपैकी 92 हजार पात्र?
परतीच्या पावसाने खरीप पिके पाण्यात गेली. यात नैसर्गिक आपत्तीत 80 हजार 445 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी पीकविमा कंपनीकडे प्राप्त झाल्या. तर 14 हजार 647 शेतकर्‍यांच्या पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाल्याची माहिती विमा कंपन्याकडे आली. मात्र, प्रत्यक्षात सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झालेले असताना ज्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत, अशा 95 हजार 92 शेतकर्‍यांनाच विमा कंपनीने मदतीसाठी पात्र ठरविल्याचे समजते.

पीक भरलेला हेक्टरी हप्ता
भात ः 1035.20 रुपये
बाजरी ः 678.26 रुपये
भुईमूग ः 760 रुपये
सोयाबीन ः 1145.34 रुपये
मूग ः 400 रुपये
तूर ः 736.04 रुपये
उडीदः 400 रुपये
कापूसः 2999.15 रुपये
मका ः 711.96 रुपये
कांदा ः 4000 रुपये

तालुका विमाधारक मदत भेटली
अकोले 2512 74
जामखेड 33111 762
कर्जत 11263 112
कोपरगाव 13817 2377
नगर 11377 239
नेवासा 23816 5336
पारनेर 25758 137
पाथर्डी 27329 1732
राहाता 15663 4523
राहुरी 5696 1746
संगमनेर 5234 232
शेवगाव 37855 1755
श्रीगोंदा 4114 246
श्रीरामपूर 5890 995
एकूण 2,23,435 20266

20 हजार शेतकर्‍यांना 9 कोटींची भरपाई!
पीकविमा कंपनीकडे नुकसानीची माहिती प्राप्त अशा 92 हजार शेतकर्‍यांपैकी अनेकांची नावे डबल आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ही संख्या 80 हजारांहूनही कमी येऊ शकते, असा अंदाज आहे. आता यापैकी 20 हजार 266 शेतकर्‍यांनाच 9 कोटी 78 लाख 93 हजार 859 रुपयांची विमा भरपाई बँकेत वर्ग केल्याचे आकडेवारीतून दिसते.

महसूलमंत्री विखे पाटील लक्ष घालणार!
दोन दिवसांपूर्वीच नगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीकविमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक सुरू असल्याची संतप्त भावना व्यक्त केली होती. या संदर्भात लवकरच विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक लावण्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आशा अजूनही जिवंत असल्याचे चित्र आहे.

पीकविमा कंपनीला मोजले 81 कोटी!
राज्य आणि केंद्र सरकारने शेतकरी हिस्सापोटी पिकविमा कंपनीकडे प्रत्येकी 33 कोटी 66 लाखांचा भरणा आपल्या तिजोरीत केलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे 14 कोटी आणि राज्य आणि केंद्राचे 66.50 कोटी अशी सुमारे 81 कोटी रुपये संबंधित पिकविमा कंपनीला देऊ केलेले आहेत.

जिल्ह्यात शेतकरी, राज्य आणि केंद्र शासन असे मिळून सुमारे 81 कोटींचा विमा हप्ता भरलेला आहे. यापैकी 95 हजार शेतकर्‍यांच्या नुकसानीची माहिती प्राप्त आहे. हा आकडा वाढू किंवा कमीही होऊ शकतो. यापैकी 20 हजार शेतकर्‍यांना भरपाई दिली आहे. इतर शेतकर्‍यांनाही भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे.

                                                                    -तुषार भागवत, पीकविमा अधिकारी

Back to top button