खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आज अल्पवेळ योग! | पुढारी

खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आज अल्पवेळ योग!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खंडग्रास सूर्यग्रहण नुकतेच अनुभवल्यानंतर मंगळवारी (दि. 8) पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी अगदी अल्प काळासाठी मिळणार आहे. हे ग्रहण देशात पूर्वोत्तर भागात सर्वाधिक 98 टक्के आणि 3 तास ग्रहण पाहावयास मिळेल तर पश्चिम भारतातील नागरिकांना केवळ एक तास 15 मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल असे अभ्यासकांनी सांगितले.

महाराष्ट्रात कुठे, कधी दिसेल चंद्रग्रहण?
विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातून 5.30 वाजता चंद्रोदयातच ग्रहणाला सुरुवात होईल. इथे चंद्र 70 टक्के पृथ्वीच्या सावलीने झाकोळलेला दिसेल. चंद्रपूर येथे 5.33 वाजता ग्रहण दिसेल, येथे 60 टक्के भाग ग्रस्तोदित असेल. ग्रहण मध्यकाळ लगेच 5.35 वाजता तर ग्रहण शेवट 7.26 वाजता होईल. पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल.

2023 मध्ये दिसतील 4 ग्रहण
पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये एकूण चार ग्रहणे दिसणार आहेत. यात 20 एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, 5/6 मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, 14 ऑक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी 28, 29 ऑक्टोबर 2023 रोजी खंडग्रास दिसणार आहे.

पुण्यात अल्प वेळेसाठी दिसेल ग्रहण
पुण्यातील आकाश निरीक्षक डॉ. प्रकाश तुपे व मराठी विज्ञान परिषदेचे विनय आर. आर. यांनी ग्रहणाबद्दल माहिती देताना सांगितले की, चंद्रोदय वेळेतच ग्रहण होणार असल्याने अगदी कमी काळासाठी हे ग्रहण पाहता येणार आहे. चंद्राची खग्रास अवस्था काही वेळापुरतीच असणार असल्याने महाराष्ट्रातील खगोलप्रेमींना अनुभवता येणार नाही. कालावधी कमी असला तरी आकाशातील धूर, हवेतील प्रदूषणमुळे व लाईट प्रदूषणामुळे ग्रहण अवस्था अनुभवणे कठीण जाणार आहे. यामुळे यावेळी अभ्यासकांनी कोणतीच व्यवस्था केलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उंच ठिकाणी जाऊन पाहावे लागणार
पुणे व परिसरातून सायंकाळी चंद्रोदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत चंद्रबिंब ग्रासलेले पाहायला मिळेल. यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही. चंद्रोदयानंतर थोड्याच वेळात (25-30 मिनिटे) ग्रहण संपणार असल्याने क्षितिजालगत घडणारा हा आविष्कार पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एखाद्या उंच ठिकाणावर जाणे आवश्यक आहे. हे ग्रहण एकूण 3 तास 50 मिनिटे चालेल. पृथ्वीच्या बहुतांश भागातून ते दिसेल. ग्रहण दिसण्याची वेळ आणि ग्रहणाचे स्वरूप स्थानपरत्वे वेगवेगळे असेल.

 

Back to top button