उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.30) पंंचवटी परिसरातील पेठ रोड भागाच्या पाहणी दौर्‍यावर आलेले होते. या पाहणी दौर्‍यादरम्यान आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती सांगत लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले.

पेठ रोड भागातील राऊ हॉटेल ते महापालिकाहद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिले. महापालिका शहर अभियंता आणि आंदोलकांमध्ये बैठक होऊन खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा विसर पडल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेताच महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी निविदा काढली. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करत गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले होते, परंतु आजमितीला रस्ता दुरुस्तीचे काम बंद असून, स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढल्याचे नागरिक बोलत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी या रस्ता दुरुस्ती करण्याच्या तसेच सुरू असलेल्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ढिकले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या निधीतून काम पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे गुरुवारी भुसे नाशिक दौर्‍यावर असताना त्यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पेठ रोड येथे पालकमंत्री हे पाहणी दौर्‍यासाठी आले असता आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देत लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे, अशी मागणी केली. त्यावेळी लवकरच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करत काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे समजते. यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीश उगले पाटील, प्रसिद्धिप्रमुख चंदन पवार, युवा आघाडी राज्य समिती सदस्य स्वप्निल घिया, युवा आघाडी सहसचिव प्रदीप लोखंडे, चंद्रशेखर महानुभव, सौरभ मराठे उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT