लोकवाद्यात तरबेज होतेय तरुणाई | पुढारी

लोकवाद्यात तरबेज होतेय तरुणाई

सुवर्णा चव्हाण :

पुणे : दिमडी असो वा संबळ…ढोलकी असो वा डफ…खंजिरी असो वा नगारा…अशी महाराष्ट्राच्या मातीतील लोकपरंपरेशी जुळलेली अस्सल लोकवाद्ये शिकण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. विविध संस्थांमार्फत आणि कलाकारांकडून चालणार्‍या लोकवाद्य प्रशिक्षणवर्गात सहभागी होत 20 वर्षांपुढील तरुण-तरुणी लोकवाद्य शिकत आहेत. डफ, डफली, मृदंग, खंजिरी…अशी अनेक वाद्ये शिकण्यावर भर दिला जात असून, महाराष्ट्रासह देशभरातून अगदी परदेशातूनही काही तरुण ऑनलाईन माध्यमाद्वारे लोकवाद्यांचे शिक्षण घेत आहे

काही कलाकारांनी लोकवाद्यांचा वारसा आयुष्यभर जपला असून, हाच वारसा पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने वाद्य शिक्षणासह वाद्यांचा प्रवास, वाद्याची वैशिष्ट्ये सांगण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत.
याविषयी सुरेश लोणकर म्हणाले, माझ्याकडे नगारा आणि इतर लोकवाद्य शिकण्यासाठी अनेकजण येतात.. लोकवाद्य शिकण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. त्याचे कारण म्हणजे आताच्या घडीला लोकवाद्यांची सोशल मीडियाद्वारे होणारी प्रसिद्धी होय. स्वप्नील जाधव म्हणाला, मी सध्या ढोलकी हे वाद्य शिकत असून, लोकवाद्यांची परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

कुटुंबातूनच लाभलेला लोकवाद्यांचा वारसा मी तरुण पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकेतून संबळ हे वाद्य ऑनलाईन पद्धतीने शिकणारे आमच्या संस्थेत आहेत. मी तबलावादक असलो तरी तबला, ढोलक, ढोलकी, संबळ, दिमडी अशी वाद्ये शिकवितो. महाराष्ट्रातील लोकवाद्यांचा विचार केला तर लोकवाद्ये ही एका परंपरेशी निगडित असतात.
                                                                   – संजय करंदीकर, तबलावादक

तरुणाई शिकतेय ही वाद्ये
डमरू, दिमडी, डफ, डफली, खंजिरी, संबळ, ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदंग, चौघडा, ढोल, ताशा आदी वाद्ये.

Back to top button