उत्तर महाराष्ट्र

नाशिक पदवीधर निवडणूक : पक्षाच्या आदेशाचे पालन करणार; पालकमंत्री दादा भुसे यांची सावध भूमिका

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत अद्यापही पक्षीय स्तरावर कोणताच निर्णय झालेला नाही. पक्षाच्या आदेशानुसार स्थानिकस्तरावर कारवाई करण्यात येईल, अशी सावध भूमिका पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेसाठी तसेच ठाकरे गटात प्रवेशकर्ते झालेल्या अद्वय हिरे यांना भुसेंनी शुभेच्छा दिल्या.

नाशिकमध्ये शनिवारी (दि.28) जिल्हा नियोजन वार्षिक योजना बैठकीला हजेरी लावल्यानंतर ना. भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पदवीधर निवडणुकीत शिंदे गट व भाजप यांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याकडे ना. भुसे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी शिवसैनिक हा पक्ष आदेशावर चालणारा आहे. भाजपचे माजी नेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून, मालेगावमध्ये आपल्याविरुद्ध त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, अशी चर्चा आहे. याबाबत ना. भुसे यांना विचारले असता लोकशाहीत सर्वांना कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा अधिकार आहे. असे सांगत आपण निवडणुकीपुरते काम करत नाही, तर जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला समोरे जाऊन जिंकतो, असा खोचक टोलादेखील त्यांनी हिरेंना लगावला.

'जनताजनार्दन आहे'
वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीवर बोलताना पालकमंत्री भुसे यांनी, दुसर्‍याच्या घरात डोकावण्यापेक्षा आपल्या घरात चांगले काम करावे. आम्ही पक्षांतर्गत तसेच सरकारमध्ये चांगले काम करतो आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राहिला युतीचा प्रश्न, तर निवडणुकीपुरते एकत्रित येणार्‍यांना जनताजनार्दन माफ करत नाही, असा खोचक टोलाही ना. भुसे यांनी वंचित-ठाकरे गटाच्या युतीवरून लगावला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT