नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पर्यायाने लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख पीक आहे. चालू वर्षी कांदा पिकाचे भरघोस उत्पादन झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बाजारभाव ५०० ते ७०० रु. प्रती क्विंटल आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. कांदा बाजारभावावर काही परदेशी बाजारपेठांमध्ये बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया- युक्रेन युद्ध यांचा परिणाम झाला आहे. कांदा हे शेतकऱ्यांचे वर्षाचे प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांचा सर्व उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो. मात्र उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी काहीशी परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे. कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा स्थितीमध्ये शेतक-यांना ५०० रु. प्रती क्विंटल आर्थिक मदत देण्यात यावे. तसेच केंद्र सरकार कडून वाढीव उपाययोजना करून कांदा बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार डॉ राहुल आहेर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.