उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सराईत दरोडेखोरांची टोळी गजाआड; नऊ लाखांच्या मुद्देमालासह सहा गुन्हे उघड

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील सात जणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील दरोडा, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदुरशिंगोटे गावात २४ ऑक्टोबरला दरोडेखाेरांनी संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांच्या घरात दरोडा टाकला होता. दरोडेखाेरांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत घरातील १३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सहा लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. वावी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर दरोडेखाेरांची कपडे, शरीरयष्टी व वर्णनाच्या आधारे चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथून रवींद्र शाहू गोधडे (१९), सोमनाथ बाळू पिंपळे (२०, रा. मनमाड फाटा), करण नंदु पवार (१९, रा. इंदिरानगर, लासलगाव), दीपक तुळशीराम जाधव (रा. चंडीकापूर, ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नांदुरशिंगोटे येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यांनी संशयित सुदाम बाळू पिंपळे (रा. राजदेरवाडी, ता. चांदवड), बाळा बाळू पिंपळे व करण उर्फ दादु बाळू पिंपळे (दोघे रा. गुरेवाडी, ता. सिन्नर) यांच्यासह मिळून वावीतील पाथरे येथे घरफोडी, मीरगाव येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे सिन्नर, वाडीवऱ्हे व मनमाड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे तपासी पथकाने सुदाम, बाळा व करण पिंपळे या तिघा संशयितांना सोलापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात दोन दिवस वेशांतर करून पकडले. या संशयित दरोडेखोरांच्या ताब्यातून पोलिसांनी १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ मोबाइल, पाच दुचाकी असा नऊ लाख दोन हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने नाशिक जिल्ह्यासह बारामती पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक सागर शिंपी, मयुर भामरे, वावीचे सहायक निरीक्षक सागर कोते यांच्यासह अंमलदार ज्ञानदेव शिरोळे, रवींद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, दीपक अहिरे, विनोद टिळे, सुशांत मरकड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. दरोडेखाेरांची टोळी पकडणाऱ्या पोलिस पथकास पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT