अमरावती : भातकुलीच्या मुख्याधिकारी २० हजारांची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात | पुढारी

अमरावती : भातकुलीच्या मुख्याधिकारी २० हजारांची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट व्यवसाय सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना भातकुली नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा सतीशराव वैद्य (वय 27 ) यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. अमरावतीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई आज ( दि. ११) न्यू महालक्ष्मी नगर अमरावती येथे करण्यात आली. एका 24 वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार महिलेने भातकुली येथे शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी भातकुली नगर पंचायतीकडे केली होती. मात्र नगरपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती. नगर पंचायतच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी तक्रारदार यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार महिलेने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून २ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 11) अमरावती येथील न्यू महालक्ष्मी नगर येथे सापळा रचला. यावेळी करिष्मा वैद्य यांना २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. वैद्य यांच्याविरोधात कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरूण सावंत, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस उपाधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, केतन मांजरे, मपोहाव साबळे, राहुल वंजारी, विनोद कुंजाम, युवराज राठोड यांच्या पथकाने केली.

Back to top button