फेरीवाल्यांचे सर्वेक्षण 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार | पुढारी

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगर परिषद हद्दीतील फेरीवाल्यांचे दीनदयाळ अंत्योदय योजनेव्दारे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत सर्वेक्षण दिनांक 15 नोव्हेबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, लाभार्थी फेरीवाल्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले. तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगर परिषद हद्दीतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दि. 29 ऑक्टोबरपासून नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे. फेरीवाल्यांची नोंदणी त्यांच्या नावाच्या आधारकार्डद्वारे होणार आहे.

यामध्ये प्रथम नोंदणीसाठी फेरीवाल्यांना त्यांच्या नावाच्या मूळ कागदपत्रामध्ये आधार कार्ड, तहसीलदार यांनी दिलेले अधिवास अर्थात डोमेसाईल प्रमाणपत्र अथवा नगर परिषद रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे फेरीवाल्यांना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयुएलएम) कक्षामध्ये सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच फेरीवाला विविध प्रवर्गानुसार लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र (एससी, एसटी, मायनॉरिटी आदी प्रवर्गातील असल्यास), अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र , विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, परित्यक्ता किवा घटस्फोटीत असल्यास (घटस्फोट झाल्याचे प्रमाणीकरण कागदपत्रे सादर करावी. ही कागदपत्रे नगर परिषद येथे एनयुएलएम फेरीवाल्यांना साहाय्य कक्षामध्ये स्कॅनिंगसाठी सादर करावयाची आहेत. आतापर्यंत एकूण 664 फेरीवाल्यांची नोंदणी झाली असून, उर्वरित फेरीवाल्यांनी त्यांची नोंदणी 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे एनयुएलएम विभाग प्रमुख विभा वाणी यांनी सांगितले.

Back to top button