नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे अज्ञात व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे येथील सुकदेव विठोबा सांगळे यांच्या शेतातील साग, आंबा, लिंबाची झाडे जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकर्याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
कणकोरी येथे सुकदेव सांगळे यांच्या मालकीची गट नं. 220 मध्ये शेतजमीन आहे. या शेतात सांगळे यांनी रुजविलेली एक एकर सागाची बागेसह आंब्याची, लिंबाचे काही झाडे व जनावरांचा चारा जळून गेल्याने सांगळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सांगळे यांचा मुलगा गोविंद हा सुट्टीवर आला होता. त्यांनी हा सगळा प्रकार वडिलांना कळविला त्यावर सांगळे यांनी वावी पोलिसांत तक्रार देत खोडसाळपणा करणार्या व्यक्तीवर कडक शासन करावे, अशी मागणीदेखील केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदाळकर पुढील तपास करत आहेत.