सातारा : पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पाटणकर विरुद्ध देसाई सामना रंगणार! | पुढारी

सातारा : पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पाटणकर विरुद्ध देसाई सामना रंगणार!

पाटण : गणेशचंद्र पिसाळ : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळीही दुरंगी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर असा सहकारातील राजकीय सामना यावेळीही रंगतदार होण्याच्या दाट शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

आजवर या बाजार समितीची एकहाती सत्ता टिकवण्यात पाटणकर गट कायमच यशस्वी झाला आहे. देसाई गटाकडून प्रत्येक वेळेस कडवी झुंज देण्यात आली मात्र त्यात ते अपयशी ठरले आहेत. यावेळी सोसायटीसह ग्रामपंचायतींमध्ये आपलेच बहुमत असल्याचा दावा देसाई गटाकडून केला जात असतानाच दुसरीकडे मंत्रीपद या पार्श्वभूमीवर देसाई गटाकडून निश्चितच कडवे आव्हान उभे केले जाऊ शकते.

पाटण तालुक्यात प्रामुख्याने देसाई साखर कारखान्याची एकहाती सत्ता कायमच देसाई गटाकडे तर बहुतांशी सहकारी संस्थांची सत्ता ही पाटणकर गटाकडे अबाधित राहत आली आहे. आजवर अपवाद वगळता अनेकदा पाटणकरांनी साखर कारखान्याला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र देसाईंनी तो मोडीत काढला. तर दुसरीकडे पाटणकरांच्या अन्य सहकारी संस्थांच्या नादाला न लागता केवळ कृषी बाजार समितीतच देसाई गटाने कडवे आव्हान दिले. मात्र कायमच ते पाटणकरांकडून मोडीत काढण्यात आले आहे. सध्या राज्यासह जिल्हा व तालुक्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता शिवसेना शिंदे गट व दुसरीकडे महाविकास आघाडी असे राजकारण सुरू असले तरी तालुकास्तरावर मात्र सेन, राष्ट्रवादीपेक्षा देसाई – पाटणकर अशीच खरी लढत होणार आहे.

विधानसभेची निवडणूक 2024 ला म्हणजेच पुढच्या वर्षी होईल. विधानसभेच्या दृष्टीने देखील देसाई, पाटणकर गटाकडून मागील वर्षापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून देखील दोन्ही गटांकडून या बाजार समितीची निवडणूक ऐनवेळी अत्यंत प्रतिष्ठेची केली जाणार यातही शंका नाही.

18 जागांसाठी दुहेरी सामना..

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यामध्ये सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण 7, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1, भटक्या भटक्या व विमुक्त जाती 1 अशा एकूण 11 जागा असून त्यासाठी 1325 मतदान आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1, आर्थिक दृष्ट्या दुर्बल 1 अशा 4 जागा निवडून द्यायच्या असून त्यासाठी 1898 मतदान आहे. अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी मधून 1 सदस्य निवडून द्यायचा असून त्यासाठी 1037 मतदान आहे तर हमाल व तोलारी प्रतिनिधी मधून 1 सदस्य निवडून द्यायचा असून त्यासाठी 9 मतदार असे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 4260 इतके एकूण मतदार मतदान करणार आहेत.

Back to top button