उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न; विशेष पथकाची नेमणूक

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गरिबी व दारिद्य्राचा गैरफायदा घेत काहींनी आदिवासी समाजातील लहान मुला-मुलींना वेठबिगारी पद्धतीने कामावर ठेवल्याचे आढळले आहे. त्यात एका चिमुकलीचा खून झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये व बालकांना मजुरीस जुंपून त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण कोणी करू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या पथकामार्फत जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात भेटी देऊन तेथील पोलिसपाटील, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतीच्या मदतीने लोकांना विश्वासात घेऊन बालकामगार निर्मूलन व कायद्याविषयी प्रबोधन केले जात आहे.

शिक्षणाचा तसेच रोजगाराचा अभाव यामुळे आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आर्थिक अडचण कायम असते. त्याचा गैरफायदा काही जण घेतात व पैशांच्या मोबदल्यात आदिवासी बांधवांची मुले-मुली कामासाठी नेत असतात. या मुला-मुलींना जिल्ह्यात किंवा परजिल्ह्यात मेहनती कामास जुंपवून त्यांच्यावर अत्याचार केला जातो. याआधीही एका चिमुकलीच्या खुनानंतर हा प्रकार उजेडात आल्याने बालमजुरीचा गंभीर प्रश्न समोर आला. बालकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अज्ञानाचा फायदा घेत कारखानदार व आस्थापनांचे चालक या मुलांना कमी मोबदला देऊन मेहनतीची कामे करवून घेतात. अशा बालमजुरांच्या सुटकेसाठी ग्रामीण पोलिसांनी पथक कार्यरत केले आहे. पथकामार्फत इगतपुरी, सिन्नर, घोटी भागातील वाड्या-वस्त्या व गावांना भेटी दिल्या जात आहेत. नागरिकांचे प्रबोधन करून वेठबिगारीसंदर्भात अप्रिय घटना घडणार नाही, याबाबत जनजागृती केली जाते. मेंढपाळ, हायवेलगतची हॉटेल्स, ढाबे, टोलनाके, खाद्य पदार्थ तयार करणारे कारखाने, विटभट्ट्यांना भेटी देऊन बालकामगार नाहीत ना, याची तपासणी करून याबाबत खात्री केली जात आहे. सध्या पथकाने जनजागृतीवर भर दिला असून त्यांना अद्याप कुठेही बालकामगार आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

असे आहे पथक…
अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकात महिला सहायक निरीक्षक पुष्पा आरणे, उपनिरीक्षक योगिता पाटील, महिला हवालदार सुनीता पथवे यांच्यासह सविता ढिकले, माधुरी भोसले, हवालदार शिरीष गांगुर्डे आणि योगेश्वर तनपुरे हे प्रबोधन करीत आहेत. मोहीम अधिक व्यापक स्वरूपात कार्यरत होईल, असे पुष्पा आरणे यांनी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT