मालाडमधील जामऋषी नगरातील झोपड्यांना आग; एका तरुणाचा मृत्यू, १५ सिलिंडरचा स्फोट | पुढारी

मालाडमधील जामऋषी नगरातील झोपड्यांना आग; एका तरुणाचा मृत्यू, १५ सिलिंडरचा स्फोट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा पश्चिम उपनगरांतील मालाड पुर्वकडील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत १४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, १५ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. आगीत १० ते १५ झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर ५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.

आग लागलेल्या झोपडीतील सिलेंडर फुडल्याने आगीचे राैद्ररूप धारण केले. फुटलेल्या सिलेंडरमुळे मृत १४ वर्षीय तरुणाच्या गळ्यामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलीसांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

येथील वन जमिनीवर प्लस्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान एक सिलेंडर फुटला. फुटलेल्या सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी घरांबाहेर पळ काढला. यामुळे एका- मागून एक अशी १५ सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

दामूनगरनंतरची सर्वांत मोठी आग : 

कांदिवली येथील वन जमिनीरील वसलेल्या दामूनगर येथील झोपडपट्टीला ४ डिसेंबर २०१५ साली अशाच प्रकारे सिलेंडरचा स्‍फाेट होवून भीषण आग लागली होती. या आगीत ७ झोपडीधारकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. या आगीच्या ७ वर्षांनंतर पुन्हा अशाचप्रकारची आग जामऋषी नगरातील झोपडपट्टीला लागलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील वन जमिनीवरील झोपड्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारकडून पुनर्वसन होईल का? हे पाहणे औचित्यांचे ठरेल.

 

Back to top button