ठोकळवाडी : रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी हातपंपावर रिकामे हंडे घेऊन असलेली महिलांची गर्दी. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

अंजली राऊत

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात साजरा होताना ही स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पोहोचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईचीही भयानक व बकाल स्थिती दिसून येत आहे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. मात्र ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात पायाला फोड येइपर्यंत पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षे पूर्ण झाली तरीही आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत मायदरा-धानोशी येथील ठोकळवाडीत पिण्याचे पाणी पोहोचले नाही. डोक्यावर आग ओकणारा धगधगता सूर्य आणि येथील महिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा, हातामध्ये रिकामे हंडे आणि अनवाणी पायाने चालणार्‍या चिमुकल्या आणि जीव काढून जिवाच्या आकांताने हातपंप चालविणार्‍या महिला हे या ठिकाणचे वास्तव्य आहे. जवळपास वीस ते पंचवीस वेळेस हातपंप मारल्यानंतर पाणी येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीदेखील येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. आजपर्यंत या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुणीही सोडविला नाही गावकर्‍यांनी अनेक लोकप्रतिनिधींना निवडून दिले. मात्र कुणीही वाडीचा पाणी समस्या सोडविली नाही, असा आरोप येथील वयोवृद्ध महिला, ग्रामस्थ करत आहेत. या भागात पेयजल योजना चुकीच्या पद्धतीने राबवली, त्याचा कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे आमच्याकडे यापुढे मतदान मागायलासुद्धा कुणीही येऊ नका, अशी ताकीदच स्थानिक महिलांच्या रोषातून व्यक्त होत आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी ठोकळवाडीतील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणार आहोत, असे आश्वासन दिले आहे.

दरवर्षीप्रमाणे ठोकळवाडीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे टँकरची मागणी केली आहे. – पुष्पा बांबळे, सरपंच मायदरा-धानोशी.

ठोकळवाडी येथे पाण्याचा कोणताही शाश्वत उद्भव नसल्याने दरवर्षीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा चालू करण्यात येणार आहे. स्थानिक ठिकाणी पुरेसे पाणी असलेला हातपंप अथवा विहीर काही दिवसांसाठी तहसीलदारांमार्फत आदेश निर्गमित करून अधिग्रहण करून आपण पाणीपुरवठा करणार आहोत. काही दिवसांतच एमजीपीमार्फत आठ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत भाम धरणातून या गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. – डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी.

लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत वाडीत पिण्याच्या पाण्याच प्रश्न कोणीही सोडविला नाही. गुरा, वासरांना पिण्यासाठी, मुला-बाळांना वेळेवर अंघोळ करण्यासाठी आठ दिवस थांबावे लागते. आमचा पाणीप्रश्न कायमचा सुटेपर्यंत मत मागायला कोणीही वाडीत येऊ नये. – बसवंता जाधव, ग्रामस्थ.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT