पुणे : पोलिस ’दादा’ जरा आरोग्याकडेही लक्ष द्या! | पुढारी

पुणे : पोलिस ’दादा’ जरा आरोग्याकडेही लक्ष द्या!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील बदल, वेगवान राजकीय घडामोडी, वारंवार लागणारे बंदोबस्त, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, सततचा कामाचा ताण, कर्तव्याच्या अनिश्चित वेळा, आता हे सर्व पोलिसांच्या मुळावर उठू पाहते आहे. ऐन उमेदीच्या उंबरठ्यावर पोलिसांना हृदयविकार गाठतो आहे. त्यामुळेच पोलिस ’दादा’ जरा आरोग्याकडेही लक्ष द्या…असे म्हणण्याची वेळ आली आहे.

वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी शहर पोलिस दलातील एका फिट अन् तंदुरुस्त अशा खेळाडू कर्मचार्‍याचा सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसेच, यापूर्वी अलंकार पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना योगेश आढारी यांचा हृदयविकारानेच मृत्यू झाला होता.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना चोख बंदोबस्तासाठी दिवस-रात्र तैनात राहावे लागत आहे.

त्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर झाल्याचे वारंवार समोर येत आहे. वयोमानानुसार पोलीस खात्यातील अनेक जण आजच्या घडीला औषधोपचार करून कर्तव्यावर हजर राहात आहेत. मधुमेह, हृदयविकारासह अन्य आजारांनी त्रस्त असतानाही त्यांना बंदोबस्त, स्पेशल नाकाबंदीसह मोर्चा, सण-उत्सवावेळी तगडा बंदोबस्त राबवावा लागत आहे.

कामाच्या तासाकडे कोण देणार लक्ष?
पोलिस खात्यात वेळ काळाचे कोणतेही बंधन नाही. प्रत्येक प्रसंगी एका आदेशावर पोलिसांना ऊन, पाऊस, वारा न पाहता कर्तव्य बजवावे लागते. बहुतांश सर्वच क्षेत्रांत आठ तासांची ड्युटी आहे. मात्र, पोलिस खाते त्याला अपवाद आहे. त्यामुळेच पोलिसांच्या कामाचे तास कधी कमी होणार, हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच कुटुंबीयांसाठी वेळ देण्यास मिळाला, तर पोलिसांचे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलिसांना दुप्पट बंदोबस्त करावा लागत आहे.

डॉ. अविनाश इनामदार काय म्हणतात…
पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांची नियमितपणे आरोग्य तपासणी आवश्यक आहे. यामध्ये टू-डी इको, स्ट्रेस टेस्ट यांचा समावेश असला पाहिजे. काही पोलिसांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान आदी सवयींमुळे हृदयविकाराशी संबंधित लक्षणे उद्भवतात. कामाचा व्याप सांभाळताना सर्वांनीच आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप, यातील समतोल साधणे गरजेचे आहे. केवळ शारीरिक व्यायामावर भर न देता योगा, प्राणायाम यांचाही समावेश करावा.

Back to top button