उत्तर महाराष्ट्र

नाशिक: पोलिसांच्या रडारवर धूमस्टाइल ‘रायडर्स’

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहनाच्या मूळ रचनेत बदल करून कर्णकर्कश आवाज करत वाहने चालविणार्‍या 'रायडर्स'वर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सायलेंसर आणि हॉर्नमध्ये बदल करीत ध्वनिप्रदूषण करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाजात असून, काही वाहने जप्त करीत त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे गंगापूर पोलिसांनी नुकतीच युनायटेड बाइक रायडर्स ग्रुपच्या सदस्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत ध्वनिप्रदूषण तसेच रॅश ड्रायव्हिंग न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचेही आवाहन गंगापूर पोलिसांनी केले आहे.

शहरात कर्णकर्कश आवाज करत वाहने चालवणार्‍यांमुळे इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. अशा वाहनचालकांवर पोलिसांतर्फे कारवाई केली जात आहे. पोलिस ठाणेनिहाय कारवाईचा धडाका लावला असून, सायलेंसर आणि हॉर्नमध्ये बदल करणार्‍या चालकांवर कारवाई केली जात आहे. त्यात काहींची वाहनेही जप्त केली जात आहेत. गंगापूर पोलिसांनी आठवडाभरात 28 दुचाक्या जप्त केल्या आहेत. दरम्यान गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी पोलिस ठाण्यात बायकर्सला बोलावून घेतले. शेख यांनी संबंधित सदस्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या बाइकची माहिती घेतली. या ग्रुपमधील सदस्यांकडे अत्यंत महागड्या किमतीच्या बाइक असून, त्यांचा वेग अधिक आणि आवाजही मोठा येतो. परंतु त्यामुळे रहिवासी परिसरात वा शाळा – महाविद्यालये, हॉस्पिटलच्या परिसरामध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे, या बाइक चालविताना कोणाला त्रास होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेऊन चालविण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सायलेंसरमध्ये फेरबदल केल्यास गुन्हे दाखल करून वाहन जप्त करण्यात येईल, अशीही तंबी दिली. त्याचप्रमाणे, वाहनामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये असा सामाजिक संदेश ग्रुपच्या माध्यमातून शहरातील अन्य वाहनचालकांमध्ये करण्याचेही आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख यांनी बाइक रायडर्सच्या सदस्यांना केले.

नाहीतर भरावा लागेल हजारो रुपयांचा दंड…
दुचाकीच्या सायलेंसरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करीत वेगात धावणार्‍या दुचाकीचालकांविरोधात हजारो रुपयांचा दंड केला जात आहे. त्याचप्रमाणे वाहन जप्त करून प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवले जात आहे. त्यामुळे वाहनचालकास आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे चालकांनी वाहनाच्या मूळ रचनेत कोणताही फेरफार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT