नगर : 1,77,769 किलो धान्य होणार वाटप ; जामखेड तालुक्यात शिधापत्रिका धारकांची संख्या 44138 | पुढारी

नगर : 1,77,769 किलो धान्य होणार वाटप ; जामखेड तालुक्यात शिधापत्रिका धारकांची संख्या 44138

नान्नज : पुढारी वृत्तसेवा :  जानेवारीपासून वर्षभर अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यातील गोरगरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. जामखेड तालुक्यात एकूण शिधापत्रिका धारकांची संख्या 44138 असून, लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 77 हजार 769 इतकी आहे. या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे, असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. नियतनाचा महिना कोणताही असला तरी, अन्नधान्याचे वापट जानेवारीपासून मोफत होणार आहे. मागील वर्षातील नोव्हेंबर किंवा डिसेंबरसाठी उपलब्ध अन्नधान्याचे वितरण ही जानेवारी किंवा त्यानंतर करण्यात येत असले तरी ते अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.

अन्नधान्याच्या मोफत वितरणामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना देय असलेले मार्जिन अग्रीम अदा करण्याबाबत उद्भवणार्‍या समस्यांबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. तसेच, ज्या अन्नधान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाकडून विहीत रकमा भरून केली, अशा अन्नधान्याच्या रकमा समायोजित करण्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. केंद्र शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणार्‍या सर्व अधिकार्‍यांना व दुकानदारांना कळविण्यात यावे, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत धान्य दुकानातून मिळणार्‍या मोफत अन्नधान्यासाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी उचित कार्यवाही करावी, असेही या शासन निर्णयात नमूद केले आहे.

या निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. जामखेड शहरात 16, तर ग्रामीण भागात 87, अशी एकूण 103 स्वस्त धान्य दुकाने आहेत. यामध्ये वैयक्तिक दुकाने 53, तर सहकारी संस्था 25, तर बचत गटांकडे 25 अशी वर्गवारी आहे. तालुक्यात एकूण शिधापत्रिका धारकांची संख्या 44138 असून, तालुक्यात लाभार्थ्यांची एकूण संख्या 1 लाख 77 हजार 769 इतकी असून, जानेवारीपासून या सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.

Back to top button