बेल्हेत पेट्रोल, डिझेल पंपांवर होतंय मापात-पाप | पुढारी

बेल्हेत पेट्रोल, डिझेल पंपांवर होतंय मापात-पाप

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे परिसरातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपांवर ग्राहकांची फसवणूक होत आहे. मीटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणार्‍या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात-पाप’ केले जात असल्याबाबत ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवरील ही लूट थांबविण्यासाठी जिल्हापुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, पेट्रोलियम कंपन्याचे अधिकारी यांच्याकडून ’ऑन दी स्पॉट’ कारवाईची मागणी जोर धरत आहे.

एकाद्या ग्राहकाने पन्नास रुपयांचे पेट्रोल घेतले आणि दुसर्‍या ग्राहकांना शंभर रुपयांचे पेट्रोल घेतले तर मीटर रिडिंग ’झिरो’ केले जात नाही. शंभर रुपयांचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रीडिंग वेगवेगळे दाखविले जाते. पेट्रोल-डिझेलचा दर सातत्याने बदलतो. मात्र, अनेकदा दर कमी झाला असल्यास, दर बदलाच्या दुसर्‍या दिवशीही जुन्या दरानेच पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.

अशा तक्रारींची पडताळणी करून वैधमापन शास्त्र विभागाने वितरकांविरोधात खटले दाखल करण्याची गरज आहे. गंभीर तक्रारी असल्यास पंप जप्त करण्याची कारवाईही करण्याची तरतूद आहे. मात्र, तसे धाडस अधिकारी करीत नाही. महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम 2011 मधील तरतुदींनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपावर पाच लीटर क्षमतेचे प्रमाणित माप ठेवणे बंधनकारक आहे.

मात्र, काही पंपांवर प्रमाणित माप नाही. त्याची तपासणीही पथकांकडून केली जात नाही. पंपाची पुनर्पडताळणी व मुद्रांकन दर महिन्याला करणे गरजेचे आहे. तेही होत नसल्याची स्थिती आहे. सुट्या पैशांचा घोळ : सध्या पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर 106 रुपये 61 पैसे आहे. डिझेलचा प्रतिलिटरचा दर 95 रुपये 54 पैसे आहे.

एक लिटर पेट्रोल टाकण्यासाठी ग्राहकांकडून 107 रुपये घेतले जातात. तीन रुपये सुट्टे नसल्याने 110 रुपयांचे पेट्रोल टाकले जाते. काही पंपांवर पेट्रोल पाँइटमध्ये कापले जाते. प्रत्येक ग्राहकाला सुट्टे पैसे नसल्याचे पंपधारकांकडून सांगितले जाते. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात सातत्याने वाद होतात. अनेकदा 210 रुपये दिले तरीही 1 लिटर 97 पॉईंट पेट्रोल सोडले जाते. अनेक पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांत केवळ हवाच भरली जात असल्याचा अनुभव आहे. मात्र, रीडिंग चोख दाखविले जाते.

तक्रार केल्यास कंपनीचे विक्री प्रतिनिधी कधीही वेळेवर येत नाही.अनेक तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते,असे ग्राहक बाळासाहेब बांगर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक संरक्षण परिषदेत अनेक मुद्दे मांडले. मात्र, अनेकदा कारवाई करणार्‍या पथकातील खबर्‍यांकडूनच पेट्रोलपंप चालकांना टिप्स दिली जाते. त्यामुळे कारवाईपूर्वी कर्मचारी सावध होतात. अचानकपणे ऑन दि स्पॉट तक्रार असलेल्या पंपांवर कारवाई करणे गरजेचे आहे. कॅलिब्रोशनमध्ये बनवेगिरी करून ग्राहकांची लुबाडणूक केली जाते,असे ग्राहक संरक्षक परिषदेचे रशीदखान पठाण यांनी सांगितले.

ग्राहकांची फसवणूक करू नका, अशा सूचना सर्व पंपधारकांना केल्या आहेत. ग्राहक तक्रार असल्यास पंपावरील तक्रार पेटी, कंपनीचे विक्री अधिकारी, वैधमापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू शकतात. तक्रार केल्यास आणि तक्रारीत तथ्य असल्यास संबधित कंपनीचे विक्री अधिकारी त्यास न्याय देतात. त्यामुळे ग्राहकांत खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. चांगले पंप विनाकारण बदनाम होत आहेत,असे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे सदस्य प्रकाश पाटील भुजबळ यांनी सांगितले.

Back to top button