उत्तर महाराष्ट्र

Nashik : राजपथावर चमकणार नाशिकच्या नृत्यांगना, वंदे भारतम् नृत्यमहोत्सवासाठी निवड

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारत सरकारच्या 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाअंतर्गत वंदे भारतम् नृत्यमहोत्सव २०२३ साठी नाशिकच्या कीर्ती कला मंदिरच्या दूर्वाक्षी पाटील, श्रुती देवधर, मृदुला तारे यांची निवड झाली आहे. वंदे भारतम् साठी भारतातील नॉर्थ झोन, नॉर्थ सेंट्रल झोन, साउथ झोन, साउथ सेंट्रल झोन, ईस्ट झोन, ईस्ट सेंट्रल झोन, वेस्ट झोन व वेस्ट सेंट्रल झोन अशा विविध झोनमधून ऑडिशन घेण्यात आल्या होत्या.

त्यानंतर साउथ सेंट्रल झोनचा पहिला राउंड मुंबई येथे व दुसरा राउंड नागपूर येथे झाला. ज्यामध्ये नाशिकच्या कीर्ती कलामंदिराची अंतिमसाठी निवड झाली. अंतिम फेरी दिल्ली येथे मिनिस्टर ऑफ कल्चर किशन रेड्डी व मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ कल्चर मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत पार पडली. निवड प्रक्रिया पद्मश्री शोवना नारायण व डॉ. मंजरी देव यांनी केली. श्री. ग. किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी आणि ज्येष्ठ नृत्यांगना आणि पद्मश्री सन्मानित नलिनी आणि कमलिनी अस्थाना यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर झाले. त्यात कीर्ति कलामंदिरचे नाव होते.

कीर्ति कलामंदिरच्या ग्रुपमध्ये तीन मुली होत्या. ज्यापैकी श्रुती देवधर आणि मृदुला तारे यांनी अदिती नाडगौडा-पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण केले व दूर्वाक्षीने अलंकार व मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स पूर्ण करून सीसीआरटीची शिष्यवृत्ती मिळवली. या ग्रुपची नृत्यसंरचना तिन्ही फेऱ्यांच्या वेळी गुरू अदिती पानसे यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनाने मुलींनी तिन्ही फेऱ्या जिंकल्या.

सर्व झोनमधून निवडलेल्या ग्रुप्सना २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राजपथवर दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय परेडमध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेद्वारे कीर्ति कलामंदिराच्या नृत्यांगना, गुरू अदिती पानसे यांच्या मदतीने अटकेपार झेंडा लावला. कीर्ति कलामंदिरच्या संचालिका व ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा यांनी सर्वांचे कौतुक केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT