नाशिक (सातपूर): पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स या कंपनीतील कामगारांचे सोसायटीत दरमहा नियमित भरणा केलेले सुमारे एक कोटी रुपयांचे कर्जाचे हफ्ते कंपनी मालकाने सोसायटीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनी मालकास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रीमियम टूल्स या कंपनीत कामगारांची प्रीमियम टूल्स एम्प्लॉइज को ऑफ क्रेडिट सोसायटी आहे. या सोसायटीकडून कामगारांनी कर्ज घेतले आहे. तसेच या कर्जाचा दरमहा नियमित हप्ता आणि शेअर्सची रक्कम नियमित कामगारांच्या वेतनातून कंपनी मालक शाम केळूसकर हे पैसे कपात करीत होते. त्यानुसार सप्टेंबर २०१४ सालापासून कामगारांच्या नियमित पगारातून सोसायटीच्या मागणीनुसार शेअर्स आणि कर्ज हफ्ता अधिक व्याजापोटी कपात केलेली अशी एकूण एक कोटी ३ लाख १० हजार ९८७ रुपयांची रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ४९ अन्वये ज्या दिवशी घेतली, त्याच दिवशी प्रीमियम टूल्स एम्प्लॉइज को ऑफ क्रेडिट सोसायटी लि. सातपूर नाशिक या संस्थेकडे जमा करणे आवश्यक होते. मात्र, वेतन प्राधान्य अधिनियम १९३६ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे त्यांना देणे असलेल्या वेतनाचा भाग आहे, असे समजून संस्थेकडे कपात केलेली रक्कम भरणे आवश्यक होते. मात्र, रक्कम भरण्यात आली नसल्याचे लक्षात येताच वेतनातून कपात केलेली रक्कम हडप केल्याप्रकरणी संतोष अशोक कदम यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सातपूर पोलिसांनी कंपनी मालक संशयित श्याम चंद्रकांत केळूसकर (६८ रा. रामानंद हाइट्स, शरणपूर) यास अटक केली आहे. केळुसकर यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.