रत्नागिरी : परशुराम घाट 24 तास खुला होणार कधी? | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाट 24 तास खुला होणार कधी?

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  आगामी काळात येणारा कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवस-रात्र वाहतुकीसाठी खुला होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत दरडीचा धोका लक्षात घेऊन दिवसा हा घाट वाहनांसाठी मोकळा करण्यात आला आहे. आता पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परशुराम घाट चोवीस तास वाहतुकीसाठी खुला होणार कधी याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. परशुराम घाटातील जमीन मोबदल्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने हे काम रेंगाळले होते. फेब्रुवारीच्या अखेर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर परशुराम घाटातील कामाला गती मिळाली. मात्र, मे अखेरपर्यंत घाटातील काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीही एप्रिल ते मे असा महिनाभर परशुराम घाट वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होता. या कालावधीत देखील घाटातील काम पूर्ण झाले नाही. पावसाळ्यात घाटात दोनदा दरड कोसळल्यानंतर घाटावरील व खालील लोकांच्या सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने काही दिवस परशुराम घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, लोटे औद्योगिक वसाहत, विद्यार्थी, एस.टी. प्रशासन यांच्या नुकसानीमुळे दिवसा परशुराम घाट सुरू करण्यात आला आहे. आता रात्रीच्यावेळी परशुराम घाट खुला कधी होणार? याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

चिपळूणकडील ईगल कंपनीच्या ताब्यात असणार्‍या घाटाचा भाग बर्‍याचअंशी सुरक्षित झाला आहे. त्या ठिकाणची दरड काढण्यात आली असून या भागात पावसाळ्यात एकदाही दरड कोसळलेली नाही किंवा एकही अपघाताची नोंद नाही. या उलट खेडच्या दिशेने जाताना कल्याण टोल कंपनीच्या भागात दोनवेळा दरड कोसळली. यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याच ठिकाणी एका वळणावर डोंगराला भेगा पडल्याने ही खबरदारी घेण्यात आली. मात्र, आता पावसाचा जोर कमी आला आहे. या शिवाय भेगा पडल्याच्या घटनेनंतर घाटात एकदाही दरड कोसळलेली नाही. प्रशासनाने खबरदारी म्हणून धोकादायक ठिकाणच्या घरातील लोकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घाटाच्या वरच्या व खालील बाजूकडील लोक आपले नातेवाईक किंवा अन्यत्र आसर्‍याला गेले आहेत. आता दिवसभरात घाटातून वाहतक सुरू आहे.

रात्रीच्यावेळी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी सकाळच्यावेळी कोठेही अवजड वाहतूक अडलेली दिसून येत नाही. त्यामुळे कंटेनर व अवजड वाहने जातात कोठून? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांना चिरणी मार्गे बंदी आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून अनेकांकडे परशुराम घाटातून सरसकट वाहतूक सुरू असल्याचे व्हिडीओदेखील आहेत. त्यामुळे आता परशुराम घाटातील वाहतूक चोवीस तास सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मध्यंतरी कामानिमित्त एक महिना हा घाट बंद होता. आता दरडी कोसळण्याच्या भीतीने बंद आहे. यामुळे मुंबई ते गोवा असा प्रवास करणार्‍यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचा विचार प्रशासनाने तत्काळ करावा व गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर घाटातील रस्ता तत्काळ दुरूस्त करून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात आणि जनतेसाठी हा घाट पूर्णवेळ खुला करावा, अशी मागणी होत आहे.

लोकांना दरडीची तर अधिकार्‍यांना गुन्ह्याची भीती
गतवर्षी अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून घाटाखालील सहा घरांचे नुकसान झाले आणि तीन लोकांचा बळी गेला. या पार्श्‍वभूमीवर येथील अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी आणि अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ठेकेदार कंपनी व अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात घाट सुरू केल्यावर अपघात घडल्यास पुन्हा लोक आपल्याला जबाबदार धरतील व एक नवा गुन्हा दाखल होईल अशी भीती अधिकार्‍यांना आहे. त्यामुळे परशुराम घाट मोकळा होण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी भीतीच्या छायेखाली आहेत. लोकांना दरडीची भीती तर अधिकार्‍यांना फौजदारी गुन्हा दाखल होण्याची भीती आहे.

Back to top button