उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मनपाकडून होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे खड्ड्यांमध्ये कच; वाहनधारकांची कसरत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात मनपाच्या रस्ते दुरुस्तीचे पितळ उघडे पडल्यानंतर नाशिककरांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या मनपा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, पण रस्त्यांची दुरुस्ती न करता खड्ड्यांमध्ये नुसतीच कच टाकून कामाचे सोपस्कार उरकले जात असल्याने महाच का खड्डेमुक्त नाशिकचा संकल्पफ असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या पावसात नाशिकच्या सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य बघावयास मिळाले. विशेष बाब म्हणजे पावसाळा सुरू होण्याअगोदर शहरातील बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, याच नव्या कोर्‍या रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे दिसून आल्याने, रस्ते दुरुस्तीच्या कामांबाबत नाशिककरांनी प्रश्न उपस्थित केले होते. केवळ ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी महापालिका दरवर्षी रस्ते दुरुस्तीचे सोपस्कार पार पाडत असल्याचा घणघाती आरोपही नाशिककरांकडून केला गेला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कित्येक अपघात झाले, तसेच अनेकांना पाठीचे-मणक्याचे आजार जडले. अशात महापालिकेने नाशिककरांच्या पैशांची नुसतीच उधळण न करता प्रामाणिकपणे रस्ते दुरुस्ती करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली. परंतु, अशातही महापालिकेने आपल्या कामात फारशी सुधारणा न करता रस्ते दुरुस्तीचे सोपस्कार पार पाडण्यावर भर देण्यातच धन्यता मानली आहे. सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये केवळ कच भरली जात असल्याने, यातून वाहने चालविणे अवघड होत आहे. याशिवाय धूळ अन् कण याचाही वाहनधारकांना सामना करावा लागत आहे. सध्या शहरातील सर्वच उपनगरांमध्ये तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर अशाप्रकारे रस्ते दुरुस्ती केली जात असल्याने, नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वाहने घसरण्याचे प्रकार वाढले
सातपूरमधील सोमेश्वर कॉलनी, सद्गुरूनगर, गणेशनगर या भागांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये कच टाकण्यात आली आहे. या कचमुळे गाड्या स्लिप होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून अनेकांना दुखापत होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT