

पाटस; पुढारी वृतसेवा : दौंड तालुक्यातील पाटस ते कुसेगाव अष्टविनायक महामार्गावर वाहने सुसाट जात असल्याने अपघातात वाढ झाली आहे. कुसेगाव येथे भानोबा देवाच्या आरतीसाठी जाणार्या भक्तांची संख्या जास्त असल्याने या रस्त्यावर सध्या वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर सतत अपघात होत असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडले आहे. पाटस – कुसेगाव रस्त्यावर असलेल्या कारखाना चौक, भीमा पाटस कारखाना, दत्तनगर, मोटेवाडा चौक, भानोबा विद्यालय, वागदारमळा, श्री भानोबा मंदिर या ठिकाणी अपघातांत वाढ झाली आहे.
भानोबा विद्यालय येथून शितोळे वस्तीकडे जाणार्या रस्त्यावरून माळवाडी, भोसलेवाडी येथे जाणार्या नागरिकांची संख्या जास्त आहे. शाळेच्या भीतीमुळे समोरील रस्त्यावरील वाहन चालकांना दिसत नसल्याने अपघात होत आहेत. कुसेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री भानोबा देवाचे चार दिवसांपूर्वी गावात आगमन झाल्याने सकाळी व संध्याकाळी होणार्या देवाच्या आरतीसाठी पाटस, रोटी, वरवंड, कानगाव, गिरीम, कुरकुंभ येथील नागरिक मोठ्या संख्येने जात आहेत. सकाळी 6 च्या आरतीसाठी पहाटे पाच वाजता भाविक या रस्त्याने येतात. सध्या थंडीमुळे सर्वत्र धुके पसरले आहे. त्यामुळेदेखील अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे देवाच्या आरतीसाठी येणार्या भाविकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.