नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेला येथील मनसे नगरसेवक सलीम शेख यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मुस्लीम समाजातील काहींनी त्यांच्या या भूमिकेविषयी जाब विचारला असता शेख यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला असून, त्यांच्या माफीनाम्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढून टाकले नाहीत, तर आम्हीही मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू, असे वक्तव्य केले होते. ठाकरे यांच्या या भूमिकेविरोधात मनसेच्या बहुतांश मुस्लीम पदाधिकार्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना, नाशिकमधील सातपूर येथील नगरसेवक सलीम शेख यांनी मात्र कायद्याची बाजू घेत, ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा देत शासन आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्यांना याबाबत एका व्यक्तीने फोन करून विचारणा केली. त्यानंतर शेख यांच्या माफीनाम्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी समाजाची माफी मागत दोन्ही समाजांत तेढ निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची खंत बोलून दाखवली आहे.
प्रत्येक नागरिकासाठी सर्वप्रथम देश, त्या देशाचे संविधान आणि तेथील कायदा महत्त्वाचा आहे. प्रत्येक जातीधर्माच्या नागरिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आद्य कर्तव्य आहे. या विषयाला जातीय रंग देऊ नये.
– सलीम शेख,
नगरसेवक, नाशिक