नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
महामार्ग वाहतूक विभागाच्या एका सहायक पोलिस निरीक्षकाने गुजरात हद्दीत जाऊन सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र पोलिसांकडून येणारा सारा दबाव झुगारून त्या सामाजिक कार्यकर्त्याने सापुतारा पोलिसांना आपली तक्रार दिली आहे.
गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ते गिरीशकुमार पटेल यांनी सापुतारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी १२ च्या सुमारास नाशिक-सापुतारा मुख्य मार्गावर सापुतारा सीमेवर महाराष्ट्रातील एका खासगी गाडीतीतील चार ते पाच पोलिस गुजरातमधील पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करत होते. त्याच वेळी गिरीश पटेल हे सामाजिक कार्यकर्ते सापुतारा तेथून जात होते. या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वेग कमालीचा अधिक असल्याने या ठिकाणी वाहने अडविल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचे आपण त्यांना समजावून सांगितले. त्याचा राग आल्याने पोलिसांनी त्याला सुनावले. परंतु काही वेळाने महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी आपला पाठलाग करीत गुजरात हद्दीत येत बेदम मारहाण केली आणि घटना स्थळावरून पोबारा गेला. या मारहाणीत गिरीश पटेल यांना दुखापत झाल्याचे समजताच सापुताऱ्यातील लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा तपशील वाऱ्यासारखा पसरल्यानंतर गुजरातमधील स्थानिक माध्यमांनी या वृत्ताला कमालीचे महत्त्व दिले. हे प्रकरण पोलिसांत जाऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.
हेही वाचा :