Bird www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : नांदूरमध्यमेश्वरला ‘बर्ड रिंगिंग’ची रंगीत तालीम

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात बीएनएचएसच्या मदतीने वन्यजीव विभागाने बर्ड रिंगिंगची रंगीत तालीम घेतली. बीएनएचएसच्या संशोधकांनी स्थानिक पक्ष्यांच्या पायात जीपीएस असलेली रिंग अडकविली. त्या आधारे संबंधित पक्ष्यांचा अभ्यास केला जाणार असून, त्यानंतर पुढील हंगामात स्थलांतरित पक्ष्यांचे रिंगिंग करण्यात येणार आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात देश-विदेशातील 265 प्रजातींच्या पक्ष्यांचे आगमन होत असते. पाच महिन्यांच्या पाहुणचारानंतर हे पक्षी मायदेशी परततात. पक्ष्यांच्या हवाई उड्डाणमार्गाचा नकाशा तयार करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी तसेच संशोधनासाठी 'बर्ड रिंगिंग'चा निर्णय नाशिक वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला सन 2020 मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, कोरोनामुळे सलग दोन वर्षे रिंगिंग प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.

यंदाही बीएनएचएसच्या पुढाकारातून बर्ड रिंगिंगचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनकर्मचार्‍यांना दिलेल्या प्रशिक्षणात पाणथळ, गवताळ अधिवासाचे महत्त्व, पक्षी निरीक्षक, पक्षी ओळख, प्रगणना, माळरानातील पक्षी जीवन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी कोरोना वाढल्याने बीएनएचएसकडून वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. त्यातच पक्षी हंगाम संपल्याने बर्ड रिंगिंगची केवळ रंगीत तालीम घेण्यावर बीएनएचएसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात ट्रायल रन पार पडल्याची वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, बीएनएचएसकडे पाणथळ प्रदेशात काम केलेल्या संशोधकांची उणीव असल्याने बर्ड रिंगिंगला विलंब झाला. पुढील हंगामात बिहार व इतर राज्यांतून बर्ड रिंगिंगसाठी तज्ज्ञांना बोलावले जाणार असल्याचे समजते.

पुढील हंगामाची प्रतीक्षा
बर्ड रिंगिंगसाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सलग दुसर्‍या वर्षी बर्ड रिंगिंगचा मुहूर्त हुकला आहे. आता त्यासाठी पुढील हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर हंगाम संपल्यानंतर बर्ड रिंगिंगची ट्रायल रन घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT