नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढी वारीदरम्यान नाशिक शहरात एकाच ठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. पालखी मार्गावर वारकर्यांसाठी ई-टॉयलेटसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
पंढरपूर आषाढी वारीसाठी संत निवृत्तिनाथ महाराज पालखी 13 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करणार असून, 14 तारखेला नाशिक शहरात आगमन होईल. 27 व्या दिवशी हा पायी वारी सोहळा वाखरी (ता. पंढरपूर) येथे पोहोचेल. जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, नाशिक व सिन्नरमार्गे पालखी नगर जिल्ह्यात प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यादरम्यान जिल्ह्यात पालखीचा मार्ग सुकर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.26) बैठक पार पडली. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गात त्र्यंबकेश्वर ते सिन्नर येथील जिल्ह्याच्या वेशीपर्यंत वारकर्यांसाठी ई-टॉयलेट उभारण्यात यावे. पालखी जाणार्या मार्गावर एकेरी वाहतूक करताना पुरेसा बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना दिल्या. नाशिक शहरात ठिकठिकाणी पालखी सोहळ्याच्या स्वागताची प्रथा बंद करून नाशिक पंचायत समिती येथे सर्वांनी एकत्रित मिळून स्वागत करण्याचा निर्णय बैठकीत झाला. याशिवाय जिल्ह्यात चार ठिकाणी पालखीचा मुक्काम स्थळांवर पिण्याच्या पाण्यासह अन्य सोयी-सुविधा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. यावेळी पालखी सोहळा नियोजन समितीकडून प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जबाबदारी निश्चित – संत निवृत्तिनाथ महाराज पायी वारी सोहळ्यासाठी प्रत्येक विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये वारकर्यांसाठी ई-टॉयलेट, पाण्याचे टँकर, वैद्यकीय सुविधा, पालखी रथासोबत 40 पोलिस व 20 होमगार्ड्स, शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारणे, गॅस सिलिंडरचा पुरवठा अशा विविध बाबींचा यात समावेश आहे.