उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘हॅण्ड फूट माउथ’ आजाराने चिमुकले त्रस्त

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात अनेक भागांत 10 वर्षांपर्यंतची लहान मुले-मुली 'हॅण्ड फूट माउथ' या आजाराने त्रस्त झाले असून, या आजारामुळे हाता-पायांवर पुळ्या येत आहेत. त्याचप्रमाणे घशात व टाळूलाही काही प्रमाणात पुळ्या येत असल्याने चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने मोठ्या प्रमाणात चिमुकले या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. चार ते आठ दिवसांपर्यंत हा त्रास सहन करावा लागत असून, योग्य खबरदारी, आहार व औषधोपचारानंतर हा आजार बरा होत आहे.

'हॅण्ड फूट माउथ' आजार झालेल्यांच्या संपर्कात आल्यास शिंका, खोकल्यातून हे विषाणू पसरू शकतात. आजारी व्यक्तीने वापरलेल्या वस्तू लहान मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो. साधारणतः हा आजार 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना होत आहे. पुळ्यांमुळे लहान मुलांना अनेकदा बेचैनी येत असून, ती चिडचिडी होतात. घशात पुळ्या आल्यामुळे तो खूप दुखतो आणि खाताना, गिळताना त्रास होतो. त्यामुळे नियमित आहारात फरक पडल्याने चिमुकल्यांची तब्येत काहीशी खालावण्याची भीती असते. मात्र, काही दिवसांतच या पुळ्या कोरड्या होतात आणि त्यावर खपल्या धरतात. त्याचे व्रणही राहात नाहीत.

आजाराची लक्षणे अशी…

विषाणूमुळे पाच-सहा
दिवसांत लक्षणे
पहिले दोन-तीन दिवस ताप, सर्दी-खोकला
हात-पाय, तळपाय आणि तळहातावरही लालसर पुळ्या
साधारणपणे चार-सहा दिवस अंगावर पुळ्या
कमी-जास्त प्रमाणात आणि आकाराने मोठ्या पुळ्या

आजारावरील उपाय असे…

या आजारावर नियमित औषधोपचार आणि लक्षणांनुसार उपचार करावे लागतात. तापासाठी, खाज कमी करण्याचे, घशाला बरे वाटावे म्हणून औषधे वापरली जातात. आजार झालेल्यांना नेहमीप्रमाणे अंघोळ घालावी. पुळ्या स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. नेहमीचा आहार दिला तरी चालतो. घशात फोड आल्यास सगळे पदार्थ मऊ करून द्यावेत.

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे जाणवतात. त्यानंतर पुळ्याही येतात. बाह्यरुग्ण कक्षातील रुग्णांपैकी सुमारे 50 टक्के रुग्ण या आजाराचे दिसतात. रुग्णांना साध्या औषधांची गरज आहे. 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार दिसतो. आठ ते दहा दिवसांत आजार पूर्णपणे बरा होतो. – डॉ. पंकज गाजरे, बालरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT