नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रात्री जेवणासाठी पार्सल घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सय्यदपिंप्री येथील कालव्यात आढळून आला आहे. अभिषेक कैलास खरात (22, रा. भोकरदण, जालना) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभिषेक हा के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या परिसरातीलच हॉस्टेलमध्ये अभिषेक राहत होता. शनिवारी (दि.26) रात्री जेवण आणण्यासाठी अभिषेक बाहेर पडला होता. मात्र, तो परतला नाही. त्यामुळे आडगाव पोलिसांत अभिषेक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, सय्यदपिंप्री परिसरातील कालव्यात बुधवारी (दि. 2) एका युवकाचा मृतदेह आढळला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अभिषेकचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.
ना. रावसाहेब दानवे पोलिस ठाण्यात
26 फेब—ुवारीपासून बेपत्ता असलेला अभिषेक मिळून येत नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना समजली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.1) नाशिकमार्गे औरंगाबादकडे जात असताना मंत्री दानवे यांनी आडगाव पोलिसांसोबत चर्चा करून अभिषेकचा शोध घेण्यास सांगितले होते. अभिषेकचे आजोबा आणि मंत्री दानवे यांचे घनिष्ट संबंध असल्याचे समजते.
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
अभिषेक जेवणाचे पार्सल घेऊन हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर एका दुचाकीस्वाराशी त्याने चर्चा केली. तेथून पुढे चालत जात असल्याचे द़ृश्य सीसीटीव्हीत कैद आहे. मात्र, त्यानंतर अभिषेक कुठे गेला याबाबत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अभिषेकने आत्महत्या केली की, पाय घसरून कालव्यात पडला किंवा कोणी घातपात केला याबाबतचे कोडे गुलदस्त्यात आहे.