नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेकडून 9 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शहरातील महापालिकेसह खासगी शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत तब्बल दोन लाख 29 हजार 37 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यात 4 हजार 733 विद्यार्थी आजारी असल्याचे समोर आले असून, तीन हजार 282 विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. तर उर्वरित 1,451 विद्यार्थ्यांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरातील विविध शाळांमध्ये फेब्रुवारी महिन्यात दहा दिवस विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचे स्वतंत्र पाच आरोग्य तपासणी पथक तयार करण्यात आले होते. पथकामार्फत पालिका शाळांसह इतर खासगी शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आढळणार्या किरकोळ आजारांवर तत्काळ उपचार करण्यात आले, तर गंभीर आजारांची लागण असलेल्या 1,451 विद्यार्थ्यांच्या पालकांना पाल्यावर योग्य उपचार करण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी पूर्णपणे बरा होईपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांस सर्व आरोग्यसेवा मोफत देण्यात येणार असून, गंभीर स्वरूपाच्या आजार व शारीरिक व्यंगावर 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना'अंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबतचे मार्गदर्शन या पथकाच्या माध्यमातून करण्यात आले. याशिवाय महापालिकेने 50 लाख रुपयांची विशेष तरतूद अशा बालकांसाठी केली असून, या रकमेतून बालकांवर अत्याधुनिक उपचार करणे सुलभ होणार आहे. तसेच, संदर्भित रुग्णालयात उपचाराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे संनियंत्रण पथकही तयार करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेकडून वर्षातून दोनदा अशा प्रकारची मोहीम राबविली जात असून, त्याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आला आहे.
सिकलसेल, थॅलेसिमियाचे पाच रुग्ण
रक्तातील लालपेशींशी निगडित असलेल्या सिकलसेल आजाराने आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. तसेच थॅलेसिमिया हादेखील रक्ताशी संबंधित आजार असून, पूर्णतः अनुवांशिक आहे. या दोन्ही आजारांबाबत विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मात्र, अशातही या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत सिकलसेलचे दोन, तर थॅलेसिमियाचे तीन रुग्ण आढळले.
विविध व्याधींचे विद्यार्थी
रक्तक्षय : 67, त्वचारोग (कुष्ठरोग वगळता) – 77, कानातील आजार – 34, डोळ्यांचा तिरळेपणा – 52, डोळ्यातील इतर आजार – 90, द़ृष्टिदोष – 91, मतिमंद – 59, जन्मजात हृदयरोग – 19, दुभंगलेले ओठ, टाळू – 12, दातांचे आजार – 153, जन्मजात मोतीबिंदू – 5, बालपणातील कुष्ठरोग – 1