विटा मार्केट कमिटी निवडणूक : सत्ता दिल्यास कडेगाव मार्केट कमिटी वेगळी करू : माजी आमदार सदाशिवराव पाटील | पुढारी

विटा मार्केट कमिटी निवडणूक : सत्ता दिल्यास कडेगाव मार्केट कमिटी वेगळी करू : माजी आमदार सदाशिवराव पाटील

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा मार्केट कमिटी मध्ये आम्हाला सत्ता मिळाल्यास विभाजन करून पहिल्यांदा कडे गाव मार्केट कमिटी वेगळी करू, असे आश्वासन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिले. रेणावी (ता. खानापूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

विटा मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा श्रीफळ रेणावी (ता. खानापूर) येथील श्री रेवण सिद्ध मंदिरात आज माजी आमदार सदाशिवराव पाटील, आमदार अरुण लाड, बाबासाहेब मुळीक, बबनराव हसबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसन जानकर, माजी सभापती सुशांत देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रचार सभेत माजी आमदार पाटील म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आजवर सत्ताधाऱ्यांनी फक्त कार्यकर्त्यांच्या सोयी लावण्यासाठीच मार्केट कमिटीचा उपयोग केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. त्यांनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची कोणतीही पूर्तता झालेली नाही. विटा मार्केट कमिटीचा जिल्ह्यातील इतर मार्केट कमिट्यांच्या तुलनेत विकास झाला नाही. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठीच निवडणूक लढवत आहोत. बदलाचे वारे वाहत आहे. त्यामुळे निवडणूक जिंकणारच आहोत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की, महाविकास आघाडी झाल्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुका आघाडी म्हणूनच लढविण्याचा निर्णय राज्य पातळीवर झाला असताना काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली. तर शिवसेना ठाकरे गटाने माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली ही मार्केट कमिटी वाचविण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करून शेतकरी परिवर्तन पॅनेलची विट्यात सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेब मुळीक म्हणाले, केवळ निवडणूक लढवायची म्हणून नव्हे तर विटा मार्केट कमिटीत सत्तांतर घडविण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनेल उभा केलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सभापती सुशांत देवकर यांनी खानापूर आणि कडेगाव या दोन तालुक्याचा दुवा असणारी एकमेव संस्था म्हणजे विटा मार्केट कमिटी आहे. २०१४ पर्यंत मार्केट कमिटीची आर्थिक परिस्थिती बरी होती. परंतु गेल्या पाच वर्षात महिन्याला सभापती बदलून स्वतःच्या सोयीसाठी सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायला सुद्धा पैसे नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही संस्था वाचली पाहिजे, त्यासाठी परिवर्तन घडवूया असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते, हर्षवर्धन बागल, संग्राम देशमुख, कमळापूरचे सरपंच जयकर साळुंखे, बलवडीचे माजी सरपंच प्रवीण पवार, शेतकरी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार सचिन शितोळे, अँड. संदीप मुळीक, शहाजी मोरे, सिद्धेश्वर धावड, राजेंद्र जाधव, राजाराम निकम, सुशांत पाटील, सयाजी माने, शोभा कदम, मिनाज मुल्ला, महादेव रुपनर, उत्तम जाधव, संभाजी बाबर, उत्तम सावंत, सचिन कुंभार, विकासराव माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार संदीप मुळीक यांनी मानले.

Back to top button