अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा | पुढारी

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री होण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपल्याला जोमाने कामाला लागावे लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शनिवारी (दि. 22) व्यक्त केले.

पक्षाच्या वतीने मोशी-लक्ष्मी चौकाजवळ एका हॉलमध्ये मासिक सभा घेण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, अरुण बोर्‍हाडे, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, देवेंद्र तायडे, माजी नगरसेवक राहुल भोसले, सतीश दरेकर, पंकज भालेकर, श्याम लांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, राजेंद्रसिंग वालिया, राजन नायर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अजित पवार हे हजर राहणार होते. मात्र, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.

गव्हाणे म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी बूथ यंत्रणा सक्षम करणे हे या सभेचे मुख्य प्रयोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जास्तीत जास्त लोकांना जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे. महापालिका निवडणुकांसाठी सध्या ’तारीख पे तारीख’ पडत आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेस उमेदवाराकडून मात मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीत तिसरा प्रतिस्पर्धी उमेदवार रिंगणात नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करायचा आहे. तसेच, शंभरपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी कटिबद्ध व्हायचे आहे. आल्हाट म्हणाल्या की, ’बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी महिलांचा सहभाग वाढविण्यावर आपण भर देणार आहोत. त्यासाठी चिंचवड, भोसरी आणि पिंपरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष स्तरावर महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल.’ शेख म्हणाले की, ’बूथस्तरीय यंत्रणा मजबूत करण्यावर आपण भर द्यायला हवा. युवकांचा त्यासाठी सहभाग वाढविण्यावर भर देणार आहे.’

Back to top button