उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको

अंजली राऊत

कळवण : पुढारी वृत्तसेवा

कळवण मानूर रस्त्यावरील पुलावर रविवारी (दि.9) झालेल्या अपघात प्रकरणाचे पडसाद उमटले आहे. व्यापारी असोसिएशन व कळवण शहरातील संतप्त नागरिकांनी संभाजीनगर गावठाण परिसरात सोमवारी (दि.10) सकाळी ९ वाजता रास्ता रोको करत तीव्र आंदोलन केले. यावेळी रस्तेकामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे विरोधात गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. या कामाबाबत अनेक राजकीय पक्ष, संघटना , व्यापारी असोसिएशन यांनी वेळोवेळी आंदोलन करून कामांना वेग घेऊन त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी संगनमताने विलंब करीत आहेत. या दिरंगाईमुळे रस्त्याची एकतर्फा वाहतूक सुरु असल्याने कळवणकर व बाहेरील वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. तसेच छोटे अपघात घडून वाहनचालकांमध्ये वादविवाद होत आहे. व्यापारी असोसिएशनने केलेल्या आंदोलनावेळी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत ठेकेदाराने ४५ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साडेचार महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री व आमदार असून तालुका मात्र पोरका झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. सण-उत्सवकाळात भाविकांच्या गर्दीने फुलले रस्ते वाहतुक नियोजनाचा अभावामुळे कोंडी होत असल्याचे वारंवार अनुभवयास मिळते. मेनरोडचे कामामुळे संभाव्य अपघात घडण्याची शक्यता असताना रविवारी, दि. 9 सायंकाळी यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले घरून अल्पबचत कलेक्शनसाठी निघाले असता बेहडी नदीच्या पुलावर साक्री डेपोतील (एम एच २० बीएल २४९८) बसचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या अजय येवले, प्रकाश भोये व एक भाविक या तिघांनाही चिरडले. घटनास्थळावरील नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अजय येवले यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर प्रकाश भोये यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. भोये यांचाही नाशिककडे जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. मात्र तिसरा जखमी व्यक्ती कोणत्या दवाखान्यात उपचारासाठी गेला याबाबत माहिती नसल्याचे समजते. याबाबत कळवण पोलिसात मोटर अपघात बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सोमवारी (दि.10) संतप्त व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी व्यापारी प्रतिष्ठानने रस्ता बंद ठेवत सकाळी ९ वाजता संभाजीनगर परिसरात कळवण नाशिक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी अपघातास जवाबदार असणाऱ्या बसचालक, रस्ते कामाचे ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक दोन तास ठप्प होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात व्यापारी असोसिएशनचे मोहनलाल संचेती, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, माजी जिप सदस्य शैलेश पवार, माजी नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, छावा संघटनेचे प्रदिप पगार, माकपाचे सरचिटणीस मोहन जाधव, शिंदे गटाचे जितेंद्र पगार, शरद पगार, रोटरी क्लबचे सेक्रेटरी रविंद्र बोरसे, लक्ष्मण खैरनार, भाजपचे विकास देशमुख, संदीप अमृतकार यांचेसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT