उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती

गणेश सोनवणे

सप्तशृंगगगड प्रतिनिधी :

सप्तशृंगगड हे धार्मिक तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने सपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे गाव आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या एक ते दीड महिन्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा करणारे भवानी धरण हे पुर्ण भरून वाहु लागले आहे. असे असतानाही येथील नळांना चार ते पाच दिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. पंपहाऊस मधील मोटर मध्ये बिघाड होत असल्याने गावात आठ दिवसापासुन पाणीपुरवठा होत नसल्याने भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सुर आहे.

गावापासुन तीन कि.मी अंतरावर भवानी पाझर तलाव असून हा तलाव संततधार पावसामुळे भरून वाहु लागला आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. पाणीप्रश्न हा सप्तशृंगगडावरील गडावासियाच्या पाचवीला पुजलेला सर्वात मोठा प्रश्न आहे, याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी तक्रारीही केल्या पण परिस्थिती जैसे थे असते.  एकीकडे या धरणासाठी लांखो रूपये खर्च होता पण पुन्हा उन्हाळ्यात परिस्थिती जैसै थे होते. कारण या धरणाची गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यात सध्यस्थितीत हंडामध्ये पावसाचे पाणी जमा करून धुणीभांडी करण्यासाठी जमा करावे लागत आहे. कारण नळाना आठ ते दहा दिवसानंतर पाणी येते तर पाणी साठविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत फक्त बघण्याची भुमिका पार पाडत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थितीत करीत आहे.

पाणी सोडण्याचे नियोजन नाही, सकाळी सहा वाजता पाणी सोडतात तर राञी आठ वाजेपर्यत पाणी सोडण्याचे वाॅल चालु असतात याबाबत ग्रामपंचायतला कसले सोयरेसुतक नसल्याने "अधळ दळतय कुञ पीठ खातंय" अशी परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणुन ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाडुन स्थानिक स्तरावर पाण्याचे वितरणाचे नियोजन करणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांची आहे. ग्रामसेवक सतत आजारी असल्याने कामाबाबत निर्णय होणे गरजेचे आहे, एकीकडे लोकांकडुन पाणीपट्टी घेतात तर पाण्याचे वितरणाचे नियोजन करणे हे ग्रामपंचायतचे काम आहे. याबाबत लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे अन्यथा महिलांवर भर पावसाळ्यात मोर्चा काढण्याची वेळ येईल अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

सप्तशृंगगडावर पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाऊस पडत असतो पण पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते व वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत ग्रामपंचायतने नियोजन करणे गरजेचे आहे महिलांची हेळसांड थांबवली पाहिजे-  विवेक बेनके , सामजिक कार्यकर्ते सप्तशृंगगड

ग्रामपंचायतीमध्ये समन्वयक नसल्याने व पाणीपुरवठा करण्यासाठी वेळ नसल्याने नळाना पाणी वेळेवर येत नाही, त्यामुळे महिलांना भटकंती करावी लागत आहे व उन्हाळ्यात अडचण येतेच पण आता पावसाळ्यात असे हाल होत असेल तर हे गडवासियांचे दुर्दैवं म्हणावे लागेल – कैन्हैया जाधव, तालुका अध्यक्ष प्रहार संघटना कळवण

ग्रामपंचायत हे गावाचे पालक असते पण गडावरील पाणी टंचाई हा मोठा प्रश्न असुन यासाठी ग्रापंचायतीने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. या ठिकाणी भाविकभक्तांची वर्दळ चालु असते. त्यांनाही पाणी पुरविणे गरजेचे आहे. योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते- दीपक जोरवर , ग्रामस्थ सप्तशृंगगड

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT