दामिनी पथकाला झाली कारवाईची उपरती | पुढारी

दामिनी पथकाला झाली कारवाईची उपरती

नगर : पुढारी वृत्तसेवा :  टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी असलेल्या दामिनी पथकाला कर्तव्याचा विसर पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत असतानाच न्यू आर्टस् कॉलेजच्या गेटवर विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर का होईना, टवाळखोरांवर कारवाईची उपरती दामिनी पथकाला झाली. वरिष्ठांकडून दामिनी पथकाच्या कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी (दि.4) महाविद्यालयांच्या गेटवर टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.

न्यू आर्टस् कॉलेज, रेसिडेन्सीअल हायस्कुल, सिद्धी बाग या ठिकाणी विना परवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सीट वाहन चालविणारे, फॅन्सी नंबरप्लेट लावणारे व शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण फिरणार्‍या टवाळखोरांवर दानिनी पथकाने कारवाई केली. एका दिवसात 68 टवाळखोरांवर कारवाई करून एकरा हजार 500 रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. टवाळखोरांना ‘धडा’ शिकविण्यासाठी दामिनी पथक एखाद्यावेळीच शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात फेरफटका मारत असल्याचे चित्र आहे. महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांच्या दामिनी पथकाकडून टवाळखोरांवर होणार्‍या कारवाईत सातत्य असणे गरजेचे आहे ; मात्र असे होत नाही. विद्यार्थ्यावर झालेल्या खुनी हल्ल्यानंतर टवाळखोरांची झाडाझडती घेण्याची ‘जाग’ दामिनी पथकाला आली.

कारवाई गंभीर घटनेनंतरच का ?
एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच दामिनी पथकाला टवाळखोरांवर कारवाई करण्याची जाग का येते, असा प्रश्न आहे. मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दामिनी पथकाची दररोज गस्त असली तरच टवाळखोरांना चाप बसेल.

हेही वाचा :

Kolhapur : चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; आजरा, गडहिंग्लज तालुकावासियांकडून समाधान

महिलेची ओळख तिच्‍या वैवाहिक स्‍थितीवर अवलंबून नसते : मद्रास उच्‍च न्‍यायालय

Back to top button