उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सफाई कामगारांसाठी भजन आंदोलन : प्रहार संघटना; नगरपालिकेने कामावर घेण्याची मागणी

अंजली राऊत

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
सुमारे 29 वर्षांपासून म्हणजेच सन 1993 पासून त्र्यंबकनगरी स्वच्छ करण्याचे काम करणार्‍या कंत्राटी सफाई कामगारांना नगरपालिकेने कामावर घ्यावे, म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरपालिका कार्यालयासमोर भजन करत आंदोलन सुरू केले आहे.

भजनात त्यांनी केलेली काव्यरचना उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये कोरोना काळात सारे जग घरात असताना सफाई कामगार नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालून स्वच्छतादूताचे काम करत होते. त्यामुळे त्यांचा कोरोनायोद्धे म्हणून सन्मान झालाच पाहिजे. परंतु त्र्यंबक नगरपालिकेने या कामगारांचा रोजगार हिसकावून अन्याय केला आहे. त्यासाठी वारंवार निवेदन व आंदोलने करण्यात आली. परंतु आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. काही कामगारांना सूडबद्धीने घर खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले. तर काहींनी रोजगार गेल्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, अशा आशयाचे हे भजन गायले जात आहे. नगरपालिकेने सफाई कामगारांना नोकरीवर रुजू करून घ्यावे यासाठी सोमवारी (दि.6) सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील व त्र्यंबकेश्वर अध्यक्ष नानाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भजन गात साखळी उपोषण सुरू केले आहे. आ. बच्चू कडू यांचा प्रहारच्या झेंड्याखाली जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. तर न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT