उत्तर महाराष्ट्र

Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवैधरीत्या व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. स्कूल बस नियमावली २०११ नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी नाशिक शहरासाठी जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि. ३०) बैठक घेण्यात आली. त्यावेळी नाईकनवरे यांनी आदेश दिले आहेत.

या बैठकीत अनेक निर्णय झाले असून, त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेल्या संकेतस्थळावर सर्व शाळांनी त्यांच्याकडील माहिती अद्ययावत करावी. तसेच परिवहन समिती बैठक माहिती, शाळेशी करारबद्ध असलेल्या स्कूल बसची माहिती, विद्यार्थी वाहतुकीबाबतची तक्रार नोंदविण्याची सुविधा संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. अवैधपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस व आरटीओ यांनी संयुक्तपणे कारवाई करावी.

पालकांनी आपल्या पाल्याकडून बसचालकाच्या वर्तणुकीची नियमित विचारणा करावी व कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याबाबत संबंधितांकडे तक्रार करावी, अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त वसंत मोरे उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT