नगर : ना कायद्याचा धाक, ना पोलिसांचा वचक ! | पुढारी

नगर : ना कायद्याचा धाक, ना पोलिसांचा वचक !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कापड बाजारातून शॉपिंग करुन घरी जात असताना धूमस्टाईल चोरट्याने मोपेड दुचाकीवरील आई व मुलीच्यामध्ये असलेली पर्स हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (दि.30) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. महिनाभराच्या आत ही सहावी घटना आहे. सराईत चोरटे उजळ माथ्याने शहरात फिरत असल्याने व चोर्‍या, लुटमार्‍या करत असल्याने कायद्याचा धाक संपला की, पोलिसांचा वचक? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अफिफा हबीब शेख (रा.मार्कंडेय सोसायटी, गुलमोहर रोड, अहमदनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची मुलगी नशरा हबीब शेख या दोघी कापड बाजारात शॉपिंग करण्यासाठी बुधवारी सायंकाळी गेल्या होत्या.

शॉपिंग करुन घरी परत येत असताना कलेक्टर ऑफीसच्या पाठीमागे असलेल्या मार्कंडेय सोसायटी जवळ मोपेड दुचाकीवरुन त्या आल्या असता चोरट्याने त्यांच्याजवळील पर्स हिसकावून नेली. दुचाकीवरुन आलेल्या व काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या चोरटा पर्स हिसकावून निघून गेला. अकरा हजार किमतीचे दोन मोबाईल, तीन एटीएम कार्ड, चार हजरांची रोख, खरेदी केलेले कपडे असा 16 हजारांचा ऐवज पर्स मध्ये होता. पर्सची चोरी झाल्यानंतर शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह

गत काही दिवसांपासून रस्ता लुटारूंचा शहरात हैदोस सुरू आहे. वाढलेल्या चोर्‍या, लुटमार्‍यांमुळे क्राईम ग्राफ चर्चेत आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले चौकात महिलेचे गठन लांबविल्याची घटना घडली. 10 नोव्हेंबरला गुलमोहर रोडवर महिलेचे गंठण चोरट्यांनी ओरबडून नेले. त्यानंतर तोतया पोलिस असल्याचा बनाव करुन वृद्धाचे दागिने पळविल्याची घटना 22 नोव्हेंबरला घडली. या सततच्या घटनांमुळे शहर पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरट्यांचे नगर पोलिसांना ओपन चॅलेंज

रस्तात अडवून लुटणारे तसेच धूमस्टाईलने महिलांचे दागिने पळविणार्‍या चोरट्यांचे काही दिवसांपासून चांगलेच फावले आहे. सततच्या चोर्‍या, घरफोड्यांमुळे नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरटे मात्र मोकाटच आहेत. गत आठवड्यात थेट पोलिस मुख्यालयातच चोरी झाल्याने चोरट्यांनी नगर पोलिसांना ओपन चॅलेंज दिल्याची चर्चा नगरकरांमध्ये आहे.

Back to top button